आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला जाणारे पाणी रोखणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चरखी दादरी : देशातील हक्काचे पाणी नदीतून वाहत सीमेपलीकडे जात आहे. ते रोखून हरियाणातील प्रत्येक घराला आणि शेतीला देण्यात येईल, अशी माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर पाण्याच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राइक करण्याचे संकेत दिले अाहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत चरखी दादरी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार बबिता फोगट यांच्या प्रचारासाठी आयाेजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या वेळी मोदी यांनी उपस्थितांना त्यांच्या कन्येला विजयी करत विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात मदत पाेहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. मोदी म्हणाले की, देशाचे हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे. हे पाणी थांबवून हरियाणातील प्रत्येक घरात आणि शेतीला देण्यात येईल. यासाठी कामाला सुरुवातही झाली आहे. या पाण्यावर हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा अधिकार आहे. केंद्र सरकारने लहान शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते आणि राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार येताच हे काम पूर्ण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणात विधानसभा निवडणुकीतही वातावरण बदलल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे, दिशा स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले. भाजपला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. दोन-तीन जागा जिंकणारा भाजप आज राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व दहा जिंकून दिल्याबद्दल मोदींनी लोकांचे आभार मानले.

लोकांचे प्रेम, परिश्रम आणि प्रामाणिकपणामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणाने त्यांना खूप प्रेम दिले आहे. ते प्रचार करायला आणि मते मागायला येत नाहीत तर हरियाणाच त्यांना ओढून आणते, असेही मोदी म्हणाले.केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्यात दुप्पट गतीने विकास झाल्याचा दावा करत मोदी म्हणाले की, राज्यात वैद्यकीय महाविद्यालय, उद्योग आणि लॉजिस्टिक हब तयार होत आहे. राज्यात सरकारने हरियाणा एक-हरियाणवी एक या धर्तीवर कोणताही भेदभाव न करता समान विकास केला आहे.