Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Will the legislature work magic? Congress-NCP's MLAs under pressure

विधानसभेत चालेल का करिष्मा? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना धडकी

चंद्रसेन देशमुख | Update - May 25, 2019, 09:29 AM IST

अनेक प्रश्नांवरच विधानसभा निवडणुकीची समीकरणे ठरतील

  • Will the legislature work magic? Congress-NCP's MLAs  under pressure

    उस्मानाबाद - कुणीही उभारले तरी मोदी लाटेत निवडून येऊ शकतो, अशी पक्की धारणा झालेल्या राजकारण्यांची पावले गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे वळू लागली आणि पाहता-पाहता पाच वर्षांत नगण्य अस्तित्व असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे मजबूत झाली. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या सलग दुसऱ्या यशामध्ये मोदींची जादू दिसल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे. काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे ४ आमदार असतानाही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोदींचा प्रभाव दिसून आल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना धडकी भरली आहे.


    शिवसेनेचे प्रा.रवींद्र गायकवाड यांना २०१४ च्या निवडणुकीत तब्बल २ लाख, ३१ हजार मतांची आघाडी देऊन मतदारांनी मोदींचे हात बळकट केले होते. एवढ्या विक्रमी मतांनी आपला विजय होईल, अशी आशा खुद्द उमेदवारालाही नसावी, इतकी जादू मोदी नावातून दिसून आली. काँग्रेस सरकारच्या विरोधातला संताप आणि मोदींच्या कॅम्पेनिंगमुळे भाजपच्या बाजूने मतदार आकर्षित झाला होता. यावेळी मात्र, ही लाट ओसरल्याचे वरवर जाणवत असले तरी तुलनेने ही लाट वाढल्याचे दिसून आले. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे यांना सव्वा लाखाची आघाडी मिळाली असून, २०१४ च्या तुलनेने मताधिक्य कमी झाले असले तरी मतदारसंघात काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असतानाही त्यांचा प्रभाव चालला नाही. ६ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असून, मोदींची लाट अशीच कायम राहीली तर आपले काय होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

    विधानसभेत चालेल का करिष्मा?
    सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होाणार, याची चिंता लागली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत मोदींचा करिष्मा चालेल का, राज्य सरकारविरुद्ध वातावरण आहे का, सेना-भाजपची महायुती कायम राहील का, वंचित आघाडीची भूमिका काय असेल, अशा अनेक प्रश्नांवरच विधानसभा निवडणुकीची समीकरणे ठरतील.

Trending