आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी प्रकोप : जळगाव, नाशकात वादळी पाऊस; ११०० हेक्टर केळी, २५० टन कांद्याचे नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव/नाशिक - उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वादळी तडाख्याने आणखीच कवेत घेतले. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील बालठाण तालुक्यात वादळामुळे घरांचे, शाळेचे छप्पर उडून गेले, तर दोन गायींचा मृत्यू झाला.  जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावलमध्ये झालेल्या वादळी तडाख्याने १४ तालुक्यांंतील १२०० शेतकऱ्यांची ११०० हेक्टरवरील केळी व अन्य पिके नेस्तनाबूत झाली अाहेत. काही ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. 


यात धानोरा, मितावली, पारगाव, कमळगाव, पिंप्री, देवगाव, पुनगाव, पंचक, लोणी, खर्डी, वटार, सुटकार, अडावद, वडगाव या भागात संपूर्ण केळी आडवी झाली आहे. यात जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांचे केळीचे कटन येत्या काही दिवसांत सुरू होणार होते. साेमवारी (ता. ३ राेजी) अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावित यांनी गावांना भेटी दिल्या. दोनच दिवसांत सर्व गावांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यासाठी ७ चमू तयार करण्यात आले आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी नुकसानग्रस्त काही भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावल तालुक्यातील पश्चिम भागात ६ गावांत १६३ शेतकऱ्यांच्या १९८ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्याद्वारे काढण्यात आला आहे. 
 

दीड वर्षापूर्वीची पुनरावृत्ती
> २ जूनला आलेल्या वादळाने दीड वर्षापूर्वीच्या तडाख्याची आठवण करून दिली. 
> २० सप्टेंबर २०१७ रोजी आलेल्या गारपीट व वादळी तडाख्यात या भागातील एक हजार हेक्टरवरील केळी, २०० हेक्टरवरील कापूस उद‌्ध्वस्त झाला होता. या नुकसानीपाेटी १५ काेटी मदतीची रक्कम साेमवारी जाहीर केली आहे. 

 

पंचनामे करा : महसूलमंत्री
राज्य शासन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे अाहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले अाहेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नाशकात कांदा भिजला, शाळेचे पत्रे उडाले
बोलठाण |
नाशिक जिल्ह्यातील बोलठाण परिसरात झालेल्या वादळी पावसाने कल्पना गायकवाड यांचे कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्यामुळे त्यात साठवलेला १०० टन कांदा भिजून नुकसान झाले. तेथे असलेल्या दोन मोठ्या गीर गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. 


वीजपुरवठ्याचे अनेक खांब कोलमडून पडले असून वीजवाहिन्या तुटल्याने जातेगावसह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वसंतनगर येथे चंद्रभान काळू चव्हाण यांच्या कांदा चाळीवरील २० पत्रे उडाल्याने त्यात साठवलेला सुमारे १५० क्विंटल कांदा ओला झाला. तर नामदेव काळू चव्हाण यांच्या राहत्या घरावरील ४० पत्रे, रतन चव्हाण यांच्या घरावरील २० पत्रे आणि उत्तम चव्हाण, हरी चव्हाण या दोघा भावांच्या घरावरील ४० पत्रे उडाले आहेत. वसंतनगर दोन येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गाचे पूर्ण पत्रे उडाले आहेत. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...