आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल हे वरदान ; तंत्रज्ञान, चित्रभाषा आत्मसात केल्यास चित्रपट बनवणे सोपे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोबाइलसारखे माध्यम हाती आल्याने प्रत्येक जण काही ना काही चित्रित करू लागला आहे. प्रत्येकाच्या, मनात अनेक भावनांचा कल्लोळ असतो. फक्त त्याला चित्रभाषेत मांडता येणे गरजेचे आहे. यासाठी चित्रसाक्षर होणे महत्त्वाचे आहे. ज्याला चित्रभाषा आत्मसात झाली त्याला अभिव्यक्ती शक्य होते, असा सूर सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित चर्चासत्रात निघाला. 

 

नवचित्रपट निर्मात्यांना दिशा देण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी 'विथ मोबाइल एव्हरी वन इज ए फिल्ममेकर' या चर्चासत्र घेण्यात आले हाेते. यामध्ये अभिनेता संदीप कुलकर्णी, स्पंदन फाउंडेशनचे अमरजित आमले, तेजस देऊसकर, कथालेखक अमोल उदगीरकर आणि शिव कदम सहभागी झाले होते. महोत्सवाचे अध्यक्ष अशोक राणे यांनी हे चर्चासत्र हाताळले. 

 

तेजस म्हणाला की, चित्रपट बनवण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. अनेक गोष्टी तंत्रामुळेच अचेतन मनापर्यंत पोहोचतात. या माध्यमातून प्रेक्षकांशी खोलवर संवाद साधला जाणे अपेक्षित असते. कुलकर्णी म्हणाले की, उपजत काही सांगायचे असेल तर ते व्यक्त होण्यासाठी हे माध्यम सर्वोत्कृष्ट आहे. या क्षेत्रातील प्रत्येक माणूस काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. उदगीरकर म्हणाले, मोबाइल हे आपल्या हाती लागलेले वरदान आहे. विशेषत: तरुणाईच्या भाव आणि विचारविश्वात खूप काही घडते आहे. मोबाइलमुळे ते व्यक्त होण्याला माध्यम मिळाले आहे. या वरदानाचा वापर उत्तमपणे करा. आमले म्हणाले की, चित्रपट जगायला शिका. जेव्हा तुम्ही मंडळी चित्रपटाशी एकरूप व्हाल तेव्हाच तुम्ही त्याचा भाग होऊ शकाल. चित्रपट करणारी माणसे वेडी असतात. जीवन जगताना आणि जगात वावरताना संवेदना पकडायला शिका, असा सल्ला त्यांनी दिला. 
 

बातम्या आणखी आहेत...