Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | With or without allience we will win municipality! : Guardian Minister Ram Shinde

युती होवो न होवो, पण महापालिका जिंकणारच ! पालकमंत्री राम शिंदे यांचा विश्वास

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 12:00 PM IST

अहमदनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. मागील वेळी शिवसेना व भाजपने युती करुन निवडणुक लढवली होती.

 • With or without allience we will win municipality! : Guardian Minister Ram Shinde

  नगर- अहमदनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. मागील वेळी शिवसेना व भाजपने युती करुन निवडणुक लढवली होती. यावेळी वरिष्ठ पातळीवर तरी युतीबाबत निर्णय झालेला नाही. मात्र युती होवो किंवा न होवो, यावेळी काहीही झाले तरी भाजप एकहाती मनपा निवडणूक जिंकणारच, असा ठाम विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. त्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसलेली आहे. पक्ष पातळीवर सर्व जण कामाला लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.


  पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी जिल्हा नियाेजन समितीची सभा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची बाब झालेली आहे. सेनेसोबत युती करुन निवडणूक लढायची की नाही, हे अजून निश्चित नाही. पण स्वबळावर लढायची वेळ आली तरी भाजपच मनपा निवडणुकीत बाजी मारेल, असा विश्वास आहे.


  यावेळी खासदार दिलीप गांधी, भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी शहरातील विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.


  खासदार गांधी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नगर शहरातील सारसनगर परिसरात पोलिस स्टेशन करण्याची मागणी केली होती. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. शहरातील उड्डाणपुल देखील होणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी पुन्हा एकदा मनपाने ठराव केला आहे. नव्या शासननिर्णयाप्रमाणे या पुलाचे काम मार्गी लागेल, असे ते म्हणाले. सीना नदीपात्रातील अतिक्रमण काढून नदीचा श्वास मोकळा केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे त्यांनी कौतुक केले. प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी या दोन्ही जबाबदाऱ्या ते उत्तम सांभाळत असल्याचेही ते म्हणाले.


  अधिकारीच जबाबदार
  शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर असलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाले. एखाद्या सरकारी कार्यालयाच्या समोर अतिक्रमण असेल, तर त्याला संबंधित सरकारी कार्यालयातील अधिकारीच जबाबदार असेल. हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची असेल, अशी तंबी दिली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.


  दिल्लीगेटबाबत बोलण्यास टाळाटाळ
  दिल्लीगेट पाडण्याबद्दल नगरकरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. प्रशासनाची नेमकी भूमिका काय, असा सवाल पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांना करण्यात आला. तेवढ्यात खासदार गांधी त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. पालकमंत्री शिंदे म्हणाले "त्याबद्दल मला सांगता येणार नाही, माहिती घेऊन सांगतो.' जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त शेजारीच बसले आहेत. त्यांना विचारा,' असे पत्रकारांना सांगितल्यावरही पालकमंत्र्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.


  जिल्हा विभाजन होणारच
  कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याचे विभाजन होणारच, या घोषणेचा पुनरुच्चार पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. विभाजन व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. त्याला कोणाचा विरोधही नाही. जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर अर्थमंत्री मुनगंुटीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या गोष्टीचे महत्त्व पटवून दिलेले आहे. तसेच पालकमंत्री या नात्याने माझे पहिले प्राधान्य या गोष्टीलाच आहे, असे शिंदे म्हणाले. विभाजनाची प्रक्रिया सध्या महसूल व राज्य पातळीवर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Trending