सत्ता संघर्ष / ‘फाेडाफाेडी’चा भाजपवर आराेप; मात्र ‘लोटस’च्या धास्तीने राज्यात आमदार फुटण्याची शक्यता कमीच

‘माताेश्री’वरील बैठकीनंतर बाहेर पडलेले शिवसेना आमदार रंगशारदा हाॅटेलमध्ये रवाना झाले. ‘माताेश्री’वरील बैठकीनंतर बाहेर पडलेले शिवसेना आमदार रंगशारदा हाॅटेलमध्ये रवाना झाले.

कर्नाटकातील फुटीर आमदार अजूनही निवडणूक रिंगणाबाहेर, फाटाफुटीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही निर्धास्त

Nov 08,2019 08:39:00 AM IST

मुंबई - कर्नाटकमधील जनता दलाचे कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘आॅपरेशन लोटस’ करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या १७ आमदारांचे राजकीय भवितव्य आजही टांगणीला आहे. हे ढळढळीत उदाहरण डोळ्यासमोर असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचे आमदार फुटून भाजपकडे जाण्याची शक्यता नसल्याचे राजकीय अभ्यासक सांगत आहेत.


स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा नसल्यामुळे भाजपला इतर पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढताना १४ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. राज्यातील राजकीय कोंडी फुटलेली नसून शिवसेनेने सत्तासहभागाबाबत काहीही ग्रीन सिग्नल दिलेला नाही. दरम्यान, भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी केला आहे. चार महिन्यांपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार पाडताना भाजपने “आॅपरेशन लोटस” पार पाडले होते. त्या धर्तीवर महाराष्ट्रात अशी मोहीम फत्ते करता येते का, याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे. पण, कर्नाटकातील जनता दल व काँग्रेसचे जे १७ आमदार फुटले होते, त्या सर्वांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी बडतर्फ करून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घातलेली आहे. परिणामी, पक्षांतर बंदी कायदा मोडल्यामुळे या १७ आमदारांना पोटनिवडणुकीला उभे राहता आले नाही.

याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे ताजे उदाहरण डोळ्यासमोर असताना सत्तेचे आकर्षण असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार भाजपच्या गळाला लागणे मुश्कील असल्याचे मानले जाते. भाजपव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर त्याच्याविरोधात सर्वपक्षीय आमदार दिला जाईल, असे काँग्रेस व राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदाराला पोटनिवडणुकीत विजय इतका सोपा नसेल. त्यामुळे नूतन आमदारांना गळाला लावणे भाजपला सोपे ठरणार नाही.

आमदार फाेडूनच दाखवा : सेनेचे आव्हान; आम्ही आमदार फाेडणार नाहीच : भाजप

१ भाजपने आमच्या आमदारांशी संपर्क सुरू केला आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणुकीच्या आधीपासून हे सुरू आहे. त्याचा पुन्हा वापर भाजपने सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी केला आहे.

२ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, हे काँग्रेसमध्ये सर्वांचे मत आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, आमचे आमदार फुटणार नाहीत, असा विश्वास काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

३ फुटण्याच्या भीतीने शिवसेनेने आपल्या आमदारांना वांद्रे पूर्वेला एका हाॅटेलमध्ये ठेवल्याची चर्चा आहे. त्यावर ‘शिवसेनेचे आमदार काही भाजीपाला नाही, भाजपने आमचे आमदार फोडून दाखवावेत,’ असे आव्हान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिले.

४ तर आम्ही काेणाचेही आमदार फाेडणार नाही. ज्यांना भीती वाटते त्यांनी आमदार लपवून ठेवावेत, असा टाेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विराेधकांना लगावला.

पुन्हा निवडणुका झाल्यास पिछाडीची भाजपला धास्ती

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने राज्यात मतदारांचे सर्वेक्षण केले आहे. राज्यात पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपचे स्वबळावर कसेबसे ४० आमदार निवडून येऊ शकतात, अशी माहिती सर्वेक्षणात समोर आली असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर शिवसेनेशिवाय इतर कोणताही पर्याय राहिलेला नाही.

X
‘माताेश्री’वरील बैठकीनंतर बाहेर पडलेले शिवसेना आमदार रंगशारदा हाॅटेलमध्ये रवाना झाले.‘माताेश्री’वरील बैठकीनंतर बाहेर पडलेले शिवसेना आमदार रंगशारदा हाॅटेलमध्ये रवाना झाले.