आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - ‘महिला मतदारांची संख्या जास्त आहे. महिला अधिक सक्रिय, सजग झाल्या आहेत, त्यामुळे त्यांचा कल ज्या बाजूने असेल त्याच पक्षाला विजयाचा गुलाल लागेल,’ असा विश्वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५०% आरक्षण मिळाल्यामुळे आज सरपंच, जि.प अध्यक्ष, बालकल्याण सभापतीपदापर्यंत महिला पोहोचली आहे. निश्चितच याचा परिणाम मतदानावर दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.
प्रश्न : कोणत्या अजेंड्यानुसार मतदारांचे मतदान?
सलगर : शेतकरी आणि मजूर वर्ग भाजप सरकारवर प्रचंड नाराज आहे. याचा फटका मोदी सरकारला नक्कीच बसेल. महिलांच्या संदर्भातील निर्णयांमध्येही भाजपची निष्क्रियता दिसून आली आहे. त्यामुळे हे तीन घटक मतांवर निश्चित परिणाम करतील.
प्रश्न : राजकारण व घराणेशाहीवर काय सांगाल?
सलगर : शरद पवार साहेब व सुप्रियाताईंनी जातीपात, घराणेशाहीचं राजकारण कधीच केलं नाही. आर. आर. पाटील हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. लोकांनी त्यांना स्वीकारलं तेव्हा पवार साहेबांनी त्यांना गृहमंत्री, उपमुख्यमंत्री केलं. डॉ. जनार्दन वाघमारेंचंही उदाहरण आहे. माझे वडील नेते नाहीत, पण तरीही माझं कर्तृत्व बघून मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली. त्यामुळे आमच्या पक्षात कर्तृत्वावर संधी मिळते.
प्रश्न : प्रदेश पातळीवर काम करताना राज्यातल्या संभाव्य निकालांचं चित्र कसे दिसते?
सलगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातील स्थिती मी नक्कीच सांगू शकते. राज्यात आमचे किमान ११ उमेदवार विजयी होतील, याविषयी मला शंका नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी आणि बीड या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील, अशीच स्थिती आहे. आमच्या मित्रपक्षालाही चांगल्या जागा मिळतील आणि भाजप-शिवसेना राज्यात अत्यंत मर्यादित होईल, असे चित्र आहे.
प्रश्न : बारामतीत सुप्रियांचा विजय कठीण आहे, असे म्हटले जात आहे. हे कशामुळे?
सलगर : परिस्थिती एकदम वेगळी आहे. सुप्रियाताई या वेळी प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, याविषयी मलाच काय, कोणालाही शंका नाही. गेल्या पाच वर्षांत ताईंनी त्यांच्या मतदारसंघात ज्या प्रमाणात कामे केली आहेत आणि संपर्क ठेवला आहे, तसा अन्य कोणी ठेवला असेल असे मला नाही वाटत. त्यामुळे त्या अडचणीत असतील तर लोकशाहीवरचाच विश्वास उडून जाईल. पण तसे होणार नाही याची मला खात्री आहे.
प्रश्न : राज्यातील युवती किती प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडल्या गेल्या आहेत?
सलगर : मोठ्या प्रमाणात युवती या पक्षाकडे आकर्षित होत आहेत असा माझा अनुभव आहे. सुप्रियाताईंच्या कार्यपद्धतीमुळे हे आकर्षण वाढते आहे. माझ्यासारख्या अत्यंत सामान्य आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील तरुणीला इतके मोठे पद मिळू शकते, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केवळ माझ्या प्रचारासाठी ताई धावत येतात हे युवक-युवती पाहत आहेत. त्यामुळे या पक्षाविषयी युवावर्गाच्या मनात विश्वास वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.