घरकुल योजना / तीन वर्षांत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ६० टक्के घरांची कामे पूर्ण

 मराठवाड्याच्या  ग्रामीण भागातील ४८ हजार ५३२ लाभार्थींचा समावेश

Sep 05,2019 08:22:00 AM IST

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक बेघर नागरिकांना घर देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. त्या अंतर्गत गत तीन वर्षांत ६० टक्के उद्दिष्टे पूर्ण झाले आहे. ६ लाख ४५ हजार ४६५ पैकी राज्यातील ३ लाख ५० हजार ३८८ नागरिकांना घरे मिळाली आहेत. मराठवाडा ग्रामीण भागातील ४८ हजार ५३२ लाभार्थ्यांचा त्यात समावेश आहे. तर राज्यात २०२२ पर्यंत आणखी २ लाख ९५ हजार ७७ पेक्षा अधिक घरे देण्यात येणार आहेत. त्याचे जीओ टॅगिंगद्वारे सर्वेक्षणातून पात्रता यादी देखील पूर्ण केली आहे. एकूण २ हजार ८१६ लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.


२०११ मध्ये सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जन गणना करण्यात आली होती. त्यानुसार लाभार्थींंची पात्रता यादी निवडण्यात आली आहे. देशात चार कोटींवर कुटुबींयाना स्वत:चे घर नाही. त्या सर्वांना २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला हाेता. प्रत्यक्षात घरे किती लाभार्थींना मिळाली व उक्ती प्रमाणे कृतीची अंमलबजावणी कितपत झाली, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता देशात १ जानेवारी २०१६ मध्ये प्रथम १ कोटी ५० लाख ५३ हजार २ घरे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. १ कोटी ३९ लाख ४१ हजार ७०० जणांनी घरासाठी नोंदणी केली होती. आधुनिक जीओ तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करून १ कोटी २७ लाख १० हजार १३१ लाभार्थींंची निवड केली. आजवर ८३ लाख ३५ हजार ३ जणांना प्रत्यक्ष घर दिल्याचे केंद्र सरकारने आपल्या अहवालात नोंद घेतली आहे. त्यात महाराष्ट्रात ७ लाख ३५ हजार ५१० घरांचे उद्दिष्ट होते. १० लाख ७० हजार २८४ जणांनी घरासाठी नोंदणी केली होती. जीओ सर्वेक्षणातून ६ लाख ४५ हजार ४६५ लाभार्थी निवडले. त्यापैकी ५२ टक्के म्हणजे ३ लाख ५० हजार ३८८ लाभार्थींना प्रत्यक्षात घरे मिळाल्याची अहवालात म्हटले आहे.

ग्रामीणसाठी दीड लाख तर शहरी भागासाठी अडीच लाखांची तरतूद
ग्रामीण भागातील प्रती लाभार्थीसाठी १ लाख २० हजार रुपये बांधकाम, १८ हजार रुपये मजुरी आणि १२ हजार रुपये शौचालय असे एकूण १ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद केली आहे. चार टप्प्यात अनुदान अदा केले जाते. तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी एकूण अडीच लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्या अंतर्गत औरंगाबादेतील नक्षत्रवाडी येथे म्हाडा प्रकल्पांतर्गत २४०, महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री ७३१, रमाई अंतर्गत २ हजार ८५ असे एकूण २ हजार ८१६ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.

इतर घरकुल योजना
राजीव गांधी आवास योजना नामशेष :

पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे राजीव गांधी आवास योजनेची देखील प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही योजना आज केवळ नावाला उरली आहे. ५० हजार घरे देण्याचे उद्दिष्ट होते. अंमलबजावणी शून्य आहे.


रमाई योजना :

रमई आवास योजनेंतर्गत २ लाख २८ हजार ९९९ घरे देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १ लाख २२ हजार ९५२ लाभार्थींना घरांची अनुदान अदा करण्यात आले असून घरे पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


शबरी आवास योजना
शबरी आवास योजनेंतर्गत ४० हजार १६ घरे देण्याचे राज्याचे उद्दिष्टे होते. त्यापैकी २६ हजार ४४७ लाभार्थींंची घरे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.


पारधी आवास योजना :

या योजनेंतर्गत ३४०० घरे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १८४९ लाभार्थींना घरे मिळाली आहेत. याच बरोबर कोलम आदिम योजना देखील लागू आहे.

आवास योजनेचा आलेख
जिल्हा जीओ टॅग अंमल
औरंगाबाद १३१७९ ८४०८
बीड ६४२२ ४९६०
जालना ९७९० ६८१७
हिंगोली ५६७२ ४३३०
लातूर ७२११ ५१८४
नांदेड २५०५९ १३०४८
उस्मानाबाद ३६२२ २६०२
परभणी ४५४१ ३१८३

X