आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुदाम्याची वाट न पाहता, त्याच्या घरी जाणारा मित्र!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
जे. जे. महाविद्यालयातील जुन्या मित्रांच्या मैफलीत रमलेले उद्धव ठाकरे. - Divya Marathi
जे. जे. महाविद्यालयातील जुन्या मित्रांच्या मैफलीत रमलेले उद्धव ठाकरे.

सतीश सोनवणे 

मुंबई : लहानसहान गोष्टींची साधनशुचिता अंगी बाळगल्याने उद्धव यांना नियतीनेच हा बहुमान बहाल केला आहे. कुठेही गर्व नाही. अहंकार नाही. कटू बोलणं नाही. पण, वेळ पडल्यावर त्यांचं कठोर होणं, याच काळात महाराष्ट्राने पाहिलं आहे. ते यशस्वी होतील, अशी आम्हा मित्रांची पूर्ण खात्री आहे. कारण हे उद्धव सुदामा दारी येण्याची वाट पाहत नाहीत... स्वत:च सुदाम्याच्या घरी जातात..!

ते वर्ष होतं १९७९... हा काळ अलगद कागदावर, आताच्या भाषेत संगणकाच्या स्क्रीनवर किंवा मोबाइलच्या भावनांच्या विश्वात चटकन फ्लॅश झाला. पावसाने सर्दाळलेल्या दिवशी, 'जे जे स्कूल ऑफ आर्ट'च्या आवारात आमचा प्रवेश झाला. जूनचा पहिला पाऊस पडून गेला होता. वातावरणात नवा गंध पसरला होता. न्हाऊन निघालेल्या झाडांना एक नवी तकाकी आलेली... सभोवतालाचा सारा मूड जणू बहरलेला... वर्गात प्रवेश केला. असाइनमेंट, पेन्सिल, रूलर, रंग, ब्रश, सेट्स स्क्वेअर, रबर सोल्यूशन, कागद, सबमिशन्स... नव्या कल्पना... सगळं नव्या नवलाईचं गाव... असंख्य गोष्टींची माहिती होत असताना नव्या मित्रांचीही ओळख होत होती. वातावरण थोडं सैल होऊन कँटिनमध्ये बसणं, सिनिअर्सची आब राखून बोल्डनेस वाढलेला... असाच कँटिनमध्ये एकदा बसलो असताना एका मित्राने 'त्याच्या'कडे बोट दाखवून विचारले... 'ओळख झाली का..?'

माझा कोरा चेहरा पाहून तो पुढे म्हणाला अरे, हा डिंगा! ...उद्धव ठाकरे!' म्हणजे बाळासाहेबांचा... मला तोडत तो म्हणाला, येस! सन ऑफ बाळासाहेब..' हे ऐकून मी टरकलोच. तो काळ म्हणजे बाळासाहेबांचा. आपल्या अमोघ वाणीने मुंबईतल्या प्रत्येक मराठी मनात एक भारी, भक्कम आदरयुक्त स्थान निर्माण करणारे. त्यांचा हा मुलगा आह, हे डोक्यात जायला थोडा काळ लागला. मग दुरूनच त्याला निरखलं. उंच, थोडा जाडसर, हसतमुख. नोंद घेण्यासारखं व्यक्तिमत्त्व. पण, मनात थोडासा धास्तावलो. या कलाविश्वात राजकारण...

बाळासाहेब हे अफलातून कार्टून करतात, म्हणून हाही इकडे वळला. मनाला समजावले. कुठल्या तरी काॅलेजच्या एका कार्यक्रमात गर्दीत उभा होतो. सहजच बाजूला पाहिलं, तर 'तो ' अगदी खांद्याला खांदा लावून शेजारी उभा. मी थोडा बिचकलो, नजरेला नजर भिडली, पण अतिशय शांत लहर अंगावर आली. आपलीशी करणारी. या लहरीतली डेप्थ क्षणात जाणवली. मग सहज असं काही तरी काॅमेंटिव्ह बोलणं झालं.मनाने नोंद घेतली. या बोलण्यात कुठल्याही शब्दावर जोर नाही की आघात नाही. एक सौम्य बोलणं. अगदी सहज. मी खूप उंच आहे आणि तुम्ही सारे लहान, हा भाव नसणारा साधेपणा त्यात दडून आहे, हे जाणवलं. त्यावेळी वसंतदादा मुख्यमंत्री होते. त्यांचा मुलगा राजूही काॅलेजला होता. बाळासाहेबांचे व दादांचे काहीतरी क्लॅशेश चालले होते. पण, राजू आणि उद्धव या दोघांत कधीही ताणलेले संबंध काॅलेजने पाहिले नाहीत. दोघेही एकमेकांच्या घरी जात-येत होते. त्याचे प्रत्येकाशी संबंध सलोख्याचे. मी ठाकरे आहे, हा असला अॅटिट्यूड त्यात नव्हता. सुरकुती नसलेल्या स्वच्छ कापडासारखा भाव त्याच्यात होता. मग कानावर येत राहिलं... त्याने 'याचं' होस्टेलचं काम केलं... सरांच्या वडिलांची बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये सोय केली... अशा अनेक सकारात्मक गोष्टींची यादी वाढत होती. हे सगळं सांभाळून तो फोटोग्राफीही करीत होता. त्याला त्याची प्रचंड आवड होती.

काॅलेज संपलं की तो, अजित जयकार हार्बर लोकलने वांद्र्याला पळायचे. कुठे रेंगाळणं नाही की काॅलेजच्या इतर भानगडीत नाक खुपसणं नाही. मीनाताईंच्या संस्कारात तो वाढत होता. बघता बघता काॅलेज संपलं. सगळ्या मित्रांची पांगापांग झाली. प्रत्येक जण आपापल्या अवकाशाच्या कोषात दडले. उद्धवही फोटोग्राफीच्या कामात बुडून गेला. प्रदर्शन भरवून आपलं स्किल दाखवत राहिला. 'जहांगीर'च्या प्रदर्शनात तर एवढी गर्दी झाली की लोकांनी रांगेत उभं राहून ते पाहिलं. त्यावेळी डिजिटल कॅमेरे नव्हते. रोलवाले होते. त्यात फोटोग्राफी करणं थोडं अवघड काम. छाया व प्रकाश कमी जास्त झाला की फोटो खराब यायचे. पण, उद्धव त्यात मास्टर झाला. एक नवीन इन्फ्रारेड फिल्मचा प्रयोग करून प्रदर्शन भरवलं. तज्ज्ञांनी त्याची वाहवा केली. गड-किल्ल्यांवरही एक सिरीज केली. त्यावर सुरेख पुस्तक प्रकाशित केलं. हे सगळं चालंलं असताना एक दिवस वाचले की बाळासाहेबांनी त्याच्यावर शिवसेनेची जबाबदारी टाकलीय... मनात एकदम धस्स झालं. उद्धव आणि राजकारण? पण, उद्धवने तीही जबाबदारी समर्थपणे पेलली. काल त्याने मुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ, ही त्याचीच फलश्रुती!

याला अनेक कारणं असतील. पण, त्याने माणसं जोडलीत. शिवसेनेची आक्रमक ही जनमानसातील प्रतिमा त्याने अलगद पुसून काढली. त्याच्यावर अनेक आघात झाले. पण, अंगात ठाकरी रक्त असल्यामुळे तो डगमगला नाही. शांतपणे परिस्थितीला तोंड दिले. ध्यानधारणेमुळे मन शांत होऊन बऱ्याच गोष्टी प्राप्त करता येतात, असं म्हणतात. पण, मला वाटतं उद्धव या सर्व गोष्टी जन्मजात घेऊन आला आहे. शांत राहून काम करायचे. चिकाटी तर तो फोटोग्राफीतच शिकला. त्यातून कष्टसाध्य असं यश मिळवायचे. या काळात त्याने आपली आवड बाजूला ठेवून राजकारणात स्वतःला झोकून दिले. हे करताना 'जेजे' मनात दडून होतं. दहिसरला शिवसेनेची सभा होती. तिथे आमचा गुरू भडेकर राहतो. त्याने त्याला सहजच विनंती केली, 'येतोस का घरी?' आणि ती मान्य करून गडबडीत असतानाही तो त्याच्या घरी गेला. अगदी चार चौघांसारखा. त्याचं काम पाहिलं. काही सूचना केल्या. दोन जुने मित्र भेटतात, तसे ते भेटले. जुन्या आठवणी काढून मस्त हसले. या सुदाम्याघरचे पोहेही खाल्ले. नावच त्याचे उद्धव...

एक लक्षात घ्या... कथेत सुदामा पुरचुंडीभर पोहे घेऊन उद्धवाच्या म्हणजे कृष्णाच्या महालात गेला होता. पण, इथे उद्धव सुदाम्याच्या घरी गेला! एक राजस गुण असलेला... उद्धवचा वाढदिवस जुलै महिन्यात असतो. भडेकर न विसरता मित्रांच्या सोबतीने शुभेच्छा द्यायला कलानगरमध्ये जातात. त्यावर्षी उद्धवने या मित्राच्या हातात हळूच एक गिफ्ट दिले. आणि ते उघडायला सांगितले. त्यात उच्च प्रतीचे वाॅटर कलर्स होते. लंडनला गेल्यावर आठवण ठेवून त्याच्यासाठी आणलेली एक अनमोल अशी भेट होती. आम्ही सगळे मित्र भारावून गेलो...

अशीच गोष्ट बदलापूरच्या विजय वैद्य या मित्राची. त्याची सभा बदलापूरला होती. त्यानेही फोन करून त्याला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. एवढी सुरक्षा व्यवस्था असतानाही उद्धव त्याच्याकडे जाऊन मैत्रीचे धागे आणखी घट्ट करून आला.वर या मित्राला कलानगरमध्ये बोलावून स्वत:च्या हाताने शिवबंधन बांधले. 'जे जे आर्ट स्कूल'च्या बाबतीत उद्धव थोडा सेंटिमेंटल आहे. सहाध्यायी, मित्र परिवाराविषयी मनापासून प्रेम आहे. असाच एक किस्सा... उदय गायकर हा आमच्या परिवारातला मित्र एका उत्तम पब्लिकेशनमध्ये कामाला होता. त्या पब्लिकेशनने आदित्य व उद्धववर एक फोटो फीचर कम स्टोरी केली. त्यासाठी हे दोघेही कुलाब्याला ऑफिसमध्ये गेले होते. तिथे कळलं, की उदय हा याच ऑफिसमध्ये काम करतो. हा उदय थोडा अतरंगी. उद्धवलाही हे माहीत होतं. त्याने त्याला त्याच्या बाॅसच्या पाॅश केबिनमध्ये बोलावले. बाॅसच्या समोरच त्याच्याशी गळाभेट घेतली. ती पाहून तो बाॅस उडालाच. उदयवर नाराज असलेला बाॅस एकदम सरळ झाला. उद्धव जाता जाता उदयला सेट करून गेला...

अशा लहानसहान गोष्टींची साधनशुचिता अंगी बाळगल्याने त्याला नियतीनेच हा बहुमान बहाल केला आहे. कुठेही गर्व नाही. अहंकार नाही. कटू बोलणं नाही. पण, वेळ पडल्यावर कठोर होणं, याच काळात महाराष्ट्राने पाहिलं आहे. असा हा आमचा मित्र आज मुख्यमंत्री झालाय. आता त्याला 'अहो जावो' करायला हवे. कारण हा मान आहे त्या पदाचा. त्यांना अाता संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा आहे. महाराष्ट्राची बुडालेली द्वारका वर काढायची आहे. त्यात ते यशस्वी होतील, अशी आम्हा मित्रांची पूर्ण खात्री आहे. कारण त्यांचे नाव उद्धव आहे. ते सुदामा दारी येण्याची वाट पाहत नाहीत... स्वत:च सुदाम्याच्या घरी जातात..!
(लेखक प्रसिद्ध इलेस्ट्रेटर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत.)

बातम्या आणखी आहेत...