आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेला पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात सासरच्या लोकांकडून मारहाण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवाहितेच्या बँक खात्यातूनही परस्पर पैसे केले वर्ग; गुन्हा दाखल

जळगाव- दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तिच्या बँकेच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले. यानंतर तिने महिला दक्षता समितीकडे तक्रार केल्यानंतर त्या परिसरात सुनावणीसाठी आलेल्या सासरच्या लोकांनी तिथेच तिला मारहाण केली. या प्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव शहरातील शंकरअप्पा नगरातील माहेर असलेली ही २७ वर्षीय विवाहिता आहे. तसेच राज्य शासनाच्या जलविज्ञान प्रकल्पात नोकरीस आहे. जून २०१८मध्ये तिचा विवाह नाशिक येथील तरुणाशी झाला होता. विवाहानंतर पती-पत्नी बँकॉक येथे फिरण्यासाठी गेले. तेव्हापासूनच पतीने तिच्यासोबत वाईट वागणूक सुरू केली होती. सासू-सासरे व नणंद हेदेखील तिचा छळ करीत होते. काही दिवसांनंतर त्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.
यानंतर पती-पत्नी कल्याण येथे राहण्यासाठी गेले होते. तेथेदेखील परिस्थितीत काही बदल झाला नाही. दरम्यान, सासरच्या लोकांचा छळ वाढल्यामुळे ही विवाहिता काही महिन्यांपासून माहेरी येऊन राहत होती. या वेळी सासरच्या लोकांनी माहेरी येऊन तिचा मोबाइल ताब्यात घेऊन ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून तिच्या खात्यातून १ लाख ८९ हजार ७६९ रुपये परस्पर वर्ग करून घेतले. तसेच दागिने, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतले. यानंतर तिच्या सासू-सासऱ्यांनी माहेरी येऊन तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली होती. तसेच पाच लाख रुपयांची मागणीदेखील केली. न्याय्य मागण्यासाठी या विवाहितेने महिला दक्षता समितीकडे तक्रार केली होती. त्यांच्या नोटिसीनुसार तिचे सासू-सासरे सुनावणीसाठी २१ नोव्हेंबर रोजी जळगावातील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अावारात आले होते. या ठिकाणीदेखील त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमोर विवाहितेस मारहाण, शिवीगाळ केली. तसेच न्यायालयात गेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...