आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरावर जेसीबी फिरण्याच्या धास्तीने महिलेने घेतले पेटवून; सिडकोच्या अधिकाऱ्यांचा पळ, वडगाव कोल्हाटी अतिक्रमण कारवाई वेळी घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
इन्सेटमध्ये पेटवून घेतलेल्या भारती चव्हाण - Divya Marathi
इन्सेटमध्ये पेटवून घेतलेल्या भारती चव्हाण
  • महिला ३५% भाजली, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

वाळूज- वडगाव कोल्हाटी येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना आपल्या घरावरही बुलडोझर चालेल या धास्तीमुळे सिडकोचे अधिकारी आणि पोलिसांसमक्ष भारती जयराम चव्हाण (४७) या महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
वडगाव कोल्हाटी गट क्र.४ ते १४ दरम्यान तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साह्याने तगड्या पोलिस बंदोबस्तात रस्ते कामातील अडथळे, अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. महिलेने जाळून घेतल्याचे पाहताच घाबरलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. या वेळी पोलिसांनी तत्काळ आग विझवून महिलेस पोलिस प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केलेे. ही महिला ३५ टक्के भाजली असल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी दिली.
सोमवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास सिडको प्रशासनाचे विकास अधिकारी ठाकूर, सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे, कार्यकारी अभियंता दीपक हिवाळे, अभियंता उदयराज चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये तीन जेसीबी व इतर वाहनांच्या मदतीने रस्ते काम सुरू करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह ४० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. गट क्रमांक ४ मध्ये मागील चार दशकांपासून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारक महिला-पुरुषांनी या कामाला विरोध दर्शवला. मात्र, तगड्या पोलिस बंदोबस्तासमोर त्यांचा विरोध मावळला. याच दरम्यान पोलिस आयुक्तांची भेट घेऊन परत आलेल्या भारती चव्हाण यांनी स्थानिक नागरिक, सहकारी अतिक्रमणधारक आदींशी चर्चा केली. त्या वेळी परिसरात शेतामधील उभ्या पिकांवर सिडको प्रशासनाने जेसीबी फिरवून पिकांचे नुकसान केल्याची माहिती मिळताच भारती यांनी पेटवून घेतले. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी इतरांच्या मदतीने आग विझवली व खासगी रुग्णालयात दाखल केले.
ग्रामपंचायतीनेच बांधून दिले घरकुल सोमवारी पेटवून घेतलेल्या भारती चव्हाणला वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतने सन २०१५-१६ मध्ये इंदिरा अावास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देत त्याठिकाणी घर बांधून दिले होते. दरम्यान सिडको प्रशासनाकडून गट नंबर ४ व १४ मध्ये रस्ते कामाची २ जुलै रोजी सुरुवात झाली. यामध्ये सिडकोच्या वतीने गट नंबर ४ मध्ये १५ मीटर रुंद तर १५० मीटर लांब तसेच पुढे गट नंबर १४ च्या दिशेने २५० मीटर लांबीचे रस्ते कामाची मार्किंग व जेसीबीच्या मदतीने साफसफाईला सुरुवात झाली. मात्र, अतिक्रमणधारकांनी विरोध करताच ही कारवाई थांबवण्यात आली.पुढे २४ जुलै रोजी सुद्धा विरोध करत दोघा अतिक्रमणधारकांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र, यावेळी तगड्या बंदोबस्तामध्ये तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मदतीने प्रत्यक्ष कारवाईला २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अतिक्रमणधारक महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतल्याने कारवाईसाठी आलेले पथक पुन्हा परतले. हे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेले असून त्यावर चर्चेतून तोडगा काढणे अपेक्षित अाहे.

काय आहे प्रकरण?


 वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर ४ व १४ शासकीय गायरान जमीन सन १९९९ पासून सिडकोच्या विकास आराखड्यात समाविष्ट आहे. मात्र, या जमिनीवर १९७८ पासून आमचा ताबा असल्याचे बन्सी चौहाण, भारती चव्हाण, सखुबाई माळी, राया चौहाण, मोहन चौहाण, प्रेम चौहाण, भानुदास साळवे, बाबूराव वाकेकर आदी ८ जण दावा करतात. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदरील जमीन सिडको प्रशासनाकडे हस्तांतरित केल्यानंतर संबंधितांनी सदरील जमीन आम्हाला मिळावी म्हणून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी अअर्ज नामंजूर करीत या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, या प्रकरणी संबंधितांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून येत्या २७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी तारीख देण्यात आलेली आहे.चार लाख रुपये देऊन पोलिस बंदोबस्त: सिडको प्रशासनाने ४ लाख रुपये फीस भरून पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना बंदोबस्त देण्यात आला होता. दरम्यान, महिलेने पेटवून घेतल्याची घटना घडली. महिलेला विझविण्यात पोलिस कर्मचारी आघाव यांच्या हाताची बोटे भाजली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती २० ते २५ टक्के भाजली असून डेप्थ १० ते १२ टक्के असल्याचे पोलिसांनी कळविले.भारती चव्हाण या महिलेस वाचवण्यासाठी स्थानिक महिलांनी धाव घेतली.

आमची आईच आमचे आई-वडील

चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. याच गट नंबरमधील इतर अतिक्रमणे सिडकोच्या हद्दीत येऊनसुद्धा ते काढण्यास असमर्थ आहे. आम्ही आजवर या जागेचा सांभाळ करून येथे पिकं घेऊन उदरनिर्वाह करत आलोत. सिडकोने जबरदस्ती न करता चर्चेसाठी पुढे यावे. आम्हाला वडील नाहीत, आमची आई हीच आमच्यासाठी वडील आहे. तिच्यासोबत आज जे काही घडले उद्या ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा भारती चव्हाण यांचा मुलगा संतोष चव्हाणने व्यक्त केली.

जुलैतही   दोघांनी घेतले रॉकेल ओतून
 
सिडको प्रशासनाने यापूर्वी २ जुलै रोजी जेसीबीच्या मदतीने गट क्रमांक ४ व १४ साठी तयार करण्यात येणाऱ्या रस्ते कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर २३ जुलै रोजी पोलिस बंदोबस्तामध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र, त्या वेळीही दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच घाबरलेल्या सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला होता. चार महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी पुन्हा तगड्या बंदोबस्तामध्ये दाखल झालेल्या पथकाकडून रस्ते काम सुरू होताच महिलेने पेटवून घेतले व एकच खळबळ उडाली.
महिलेने पेटवून घेताच संतप्त नातेवाईक व इतर अतिक्रमणधारकांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घालून सिडको प्रशासनाच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. 

एकाच वाहनात अधिकारी ठाण्यात
 
महिलेने पेटवून घेतल्याची घटना घडताच घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पुढील कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. या वेळी वाहनांची तोडफोड किंवा सिडकोच्या अधिकाऱ्यांना मारहाण होऊ नये म्हणून पोलिस त्यांच्या रक्षणासाठी धावले. परिस्थिती हाताबाहेर जाईल हे लक्षात येताच सिडकोच्या सर्वच अधिकाऱ्यांनी एकाच वाहनात बसून थेट वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले.वरिष्ठांच्या आदेशाने काम
 
सिडको प्रशासनातर्फे ४ व १४ मधील रस्ते काम सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार रीतसर पोलिस बंदोबस्त घेऊन काम सुरू होते. ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथून काही अंतरावर महिलेने पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. अतिक्रमणधारकांनी वरिष्ठांना सांगावे. गजानन साटोटे, मालमत्ता अधिकारी, सिडको

बातम्या आणखी आहेत...