आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती काकडे यांची आत्महत्या..गच्चीवर विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून घेतले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (43) यांनी घराच्या गच्चीवर विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. नेमके कुठले औषध टोचून घेतले याची उकल झाली नसली, तरी भुलीच्या औषधाचा ओव्हरडोस घेऊन त्यांनी जीवन संपविले असल्याची चर्चा आहे.

 

नाशिक-पुणे महामार्गालगत वाजे पेट्रोलपंपासमोर ‘भारती हॉस्पिटल’ येथे ही घटना घडली. डॉ.अभिजित काकडे हे शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असून डॉ. वैजयंती या भूलतज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. वर्षभरापूर्वीच वाजे पेट्रोलपंपासमोर नवीन जागेत त्यांनी सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे. याच इमारतीच्या मजल्यावर काकडे दाम्पत्य वास्तव्यास होते. मध्यरात्री जाग आल्यावर डॉ. वैजयंती खोलीत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. अभिजित त्यांना शोधण्यासाठी बाहेर आले. हॉस्पिटलकडे जाणारा दरवाजा बंद असल्याने ते गच्चीवर गेले असता तेथे डॉ. वैजयंती या मृतावस्थेत आढळून आल्या. मृतदेहाजवळ ५ मिलीची एक सिरिंज आढळून आल्याने त्यांनी कुठले ड्रग्ज टोचून घेतले याविषयी माहिती मिळू शकली नाही. डॉ. वैजयंती काकडे यांच्या पश्चात पती डॉ. अभिजित, दाेन मुले असा परिवार आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार समजल्यानंतर शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गर्दी केली. दरम्यान, बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संगमनेरनाका येथे डॉ. वैजयंती काकडे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, डॉ. अभिजित काकडे यांनी सिन्नर पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अाकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे. याबाबत पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी तपास करत आहे.  

 
व्हिसेरा ठेवला राखून
डॉ.वैजयंती काकडे यांच्या मृतदेहाचे शहरातील नगरपालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मृतदेहाजवळ 5 मिलीची सिरिंज मिळून आल्याने त्यांनी नेमके कुठले औषध टोचून घेतले, ज्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला याचा तपशील कळण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच त्याची उकल होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.  
 
आत्महत्येची दुसरी घटना
पती-पत्नी दोघेही डॉक्टर असलेल्या घरातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची गेल्या पाच वर्षांतील शहरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जुनी कोर्ट गल्लीतील डॉ. ज्योती शाकुंतल यांनी जीवन संपविले होते. डॉ. वैजयंती काकडे यांच्या बाबतीतही या घटनेची पुनरावृत्ती झाली.  
- डॉ. वैजयंती काकडे