maharashtra local news / नवविवाहिता आढळली हातपाय तुटलेल्या अवस्थेत, शिवनी रेल्वे स्थानकानजीकची घटना

चार दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

प्रतिनिधी

Jul 21,2019 10:00:00 AM IST

अकोला-१५ जुलै रोजी शिल्पाचा विवाह मंगेश सोबत झाला. चौथ्या दिवशी ती सुखी संसाराची स्वप्ने उराशी घेवून सासरी शिवणी येथे नांदायला आली. तोच शनिवारी सकाळी रेल्वे पटरीवर हातपाय तुटलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत शिल्पा दिसून आली. सध्या शिल्पा मृत्यूशी झुंज देत असून, तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्रम्ही येथील अजाबराव ढोके यांची मुलगी शिल्पाचा विवाह मंगेश तेलगोटे रा. शिवणी याच्यासोबत १५ जुलै रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाला. १९ जुलै रोजी तिला सासरी पाठवण्यात आले. शनिवारी सकाळी मात्र शिल्पा ही गंभीर अवस्थेत दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे पटरीवर पडलेली दिसली. शिल्पाचे दोन्ही पाय व हात हे धडापासून वेगळे झाले होते. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना कळताच पोलिसांनी शिल्पाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. श्वेता चांडक व डॉ. चिंचोळकर यांनी उपचार केले. श्वेताच्या पतीला रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ठाणेदार म्हणाले, शिल्पाला माझे रक्त द्या : ठाणेदार सतीश जगदाळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शिल्पाला विश्वासात घेऊन तिला अशा अवस्थेत जगण्याचे बळ दिले. प्रचंड रक्तस्त्राव झालेला असताना स्वत: शिल्पाला रक्त देण्याची तयारी ठाणेदार जगदाळे यांनी दर्शवली. 'डॉक्टर आधी शिल्पाला वाचवा, तपासाचे नंतर बघू' असे जगदाळे म्हणताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.


सर्वोपचारमध्ये तणावाची स्थिती
शिल्पाला सर्वोपचारमध्ये दाखल केल्यानंतर तिचे माहेरचे आक्रमक झाले होते. त्यांनी घातपाताचा संशय घेताच वातावरण तणावमय झाले. मात्र रेल्वेचे ठाणेदार जगदाळे यांनी लगेच सिटी कोतवालीचे ठाणेदार नाईकनवरे यांच्याशी चर्चा केली व अतिरिक्त बंदोबस्त मागवला. त्यानंतर शिल्पाचे आई वडिलांसह नातेवाईक व सासरच्या लोकांची समजूत काढल्यानंतर तसेच पोलिस बंदोबस्तामुळे अनर्थ टळला. रेल्वे पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

X
COMMENT