आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगाच हवा म्हणत ढोंगीकडे गेली महिला, 6 भोंदू बाबांनी केला सामूहिक बलात्कार; पती म्हणाला, तिच्या हट्टामुळेच घडले सर्व...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एका महिलेवर सहा ढोंगी बाबांनी मिळून गँगरेप केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला मुलगाच हवा या हव्यासापोटी भोंदू बाबांच्या भेटी घेत होती. त्याचाच गैरफायदा घेत 6 जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिने मंदिरातच झोपलेल्या आपल्या पतीला आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची हकीगत सांगितली. तसेच दोघांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशची असलेली पीडित यापूर्वीही दोनदा बाबांच्या भेटी घेण्यासाठी आली होती. यावेळी ती आपल्या पतीला घेऊन गेली असताना हा प्रकार घडला आहे. 


तीन मुली असताना हवा होता मुलगा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी असून तिला 3 मुली आहेत. परंतु, तिला मुलगा हवा होता. पतीने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो मुलींसोबत खुश होता. मजुरी करून तो आपल्या मुलींना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न पाहत होता. परंतु, पत्नीने मुलासाठी हट्ट धरला होता. त्याची पत्नी नुकतीच माहेरी गेली होती. तेथेच राहताना बिहारच्या चौसा ब्रह्म येथे नवरात्र आणि श्रावनात विशेष पूजा केल्याने पुत्र प्राप्ती होते असे तिला सांगण्यात आले होते. याच नवरात्रीला ती एकटीच दोनदा बिहारला जाऊन आली. तसेच यावेळी आपल्या पतीला सोबत घेऊन गेली होती. 


चाकूचा धाक दाखवून केला बलात्कार!
महिलेने केलेल्या आरोपानुसार, विशेष पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबा तिला जादू-टोण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर घेऊन गेला. या दरम्यान पतीला मंदिरातच थांबण्यास सांगण्यात आले होते. पीडित महिला बाबासोबत गेली असताना त्या ठिकाणी आणखी 5 भोंदू बाबा आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून कथितरित्या महिलेला जंगलात नेले आणि तिच्यावर आळी-पाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर महिला मंदिरात परतली तेव्हा तिचा पती झोपलेला होता. तिने आपल्या पतीला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी सकाळ होताच पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी महिलेची मेडिकल टेस्ट करून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


पती म्हणाला, माझ्या तोंडावर कपडा फेकताच बेशुद्ध पडलो...
पीडित महिलेच्या पतीने सांगितले, की त्याच्या पत्नीसोबत विशेष कर्मकांड करण्यासाठी बाबा तिला एकटीच घेऊन गेला. तसेच तिची वाट पाहत तो आपल्या छोट्या मुलीसोबत मंदिरातच थांबला होता. मुलीला झोप लागली होती आणि तो शेजीराच पडला होता. रात्री 10 च्या सुमारास कुणी तरी त्याच्या तोंडावर एक कपडा फेकला. अवघ्या काही सेकंदात आपल्याला गाढ झोप लागली असा दावा पतीने केला आहे. 


काय म्हणाले पोलिस?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने त्यांना 6 जणांनी बलात्कार केल्याचे सांगितले होते. तसेच रिपोर्टमध्ये तिने 3 जणांची नावे सुद्धा दिली आहेत. पोलिस या घटनेचा सर्वच बाजूंनी तपास करत आहे. आरोपींना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस संपूर्ण तयारी करत आहेत. लवकरच संपूर्ण घटनाक्रम समोर येईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...