Maharashtra Special / महिलेने धावत्या ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म, सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी दाम्पत्य जात होते गावी

रेल्वे अधिकाऱ्यांनी आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी ट्रेन नागपुरपासून 86.5 किमीवर असलेल्या नरखेड स्टेशनवर थांबवली

दिव्य मराठी वेब

Aug 04,2019 03:19:00 PM IST

नागपूर- धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना नागपूरजवळ घडली. रामेश्वर-मंडूवाडीह एक्सप्रेसने प्रवास करत असलेल्या एका महिलेला धावत्या ट्रेनमध्ये आई होण्याचे सुख म्हणाले. आज(रविवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुनमदेवी विश्वकर्मा असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे नरखेड रेल्वे स्थानकावर थांबा नसतानाही एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या बाळ व आईची प्रकृती स्थिर आहे.


पुनमदेवी विश्वकर्मा ही तिच्या सासऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी चेन्नईहून मूळ गावी उत्तरप्रदेशात जात होती. तिच्यासोबत तिचा नवरा मनोज विश्वशर्मा होता. ते दोघेही रामेश्वरम-मंडूवाडीह एक्सप्रेसमध्ये चढले. त्यानंतर गाडी नागपूर स्टेशनमधून सुटल्यानंतर तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. त्यानंतर तिच्या नवऱ्याने ट्रेनमध्ये डॉक्टर आहेत का याचा शोध सुरु केला. पण त्यांना ट्रेनमध्ये डॉक्टर सापडला नाही. नागपूरनंतर ही एक्सप्रेस थेट मध्यप्रदेशीत इटारसीमध्ये थांबत असल्याने त्यांची काळजी वाढली. पण ट्रेनमधीला कही महिला प्रवाशांनी पुढे येत तिची धावत्या एक्सप्रेसमध्येच प्रसुती केली.


पुनमदेवी यांची प्रसूती झाल्यानंतर एक्सप्रेसमधील रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबतची सूचना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी आपत्कालीन वैद्यकीय मदत म्हणून ही ट्रेन नागपूरातून 86.5 किमीवर असलेल्या नरखेड स्थानकावर थांबवण्यात आली. त्यानंतर खास रुग्णवाहिकेची सोय करुन आई व बाळाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून बाळ व बाळंतिणी दोघेही सुखरुप आहेत.

X
COMMENT