आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळा आवळून महिलेचा खून; दोन वर्षांच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : पत्नीच्या भावाच्या काडीमोड झालेल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध जुळवून पहिली पत्नी असताना तिच्याशी लग्न केले. नंतर तिला घर भाड्याने देऊन दुसरीकडे ठेवले. कौटुंबिक कारणातून त्याच पत्नीचा सीसीटीव्ही फुटेजच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. यानंतर भिंतीला लागून असलेल्या पाळण्यातील दोन वर्षांच्या मुलीचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची दुर्दैवी घटना जालना शहरातील अंबड रोडवरील यशोदीपनगरमध्ये गुरुवारी ९ ते सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत विवाहितेची आई सायंकाळी घरी आली असता, हा प्रकार समोर आला. पूजा अमोल पाठक (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अमोल वसंतराव पाठक, उज्ज्वल अमोल पाठक यासह एक महिला, अशा बाप-लेकासह आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत पूजा हिचा विवाह आरोपी असलेल्या अमोल पाठक याच्या पत्नीचा नांदेड येथील भाऊ विनायक भाले याच्याशी झाला होता. परंतु, यानंतर तिचा काडीमोड झाला. दरम्यान, पूजा हिचे जालना हेच माहेर असल्याने तिच्याशी अमोल याने संबंध प्रस्थापित केले. त्यातून दोघांचे प्रेमसंबंधही जुळले. यानंतर पहिले लग्न झालेले असताना अमोल पाठक याने तिच्याशी दुसरे लग्न केले. यानंतर त्याने पूजाला अंबड रोडवरील यशोदीपनगर येथे एक घर भाड्याने घेऊन ठेवले होते. दरम्यान, या संबंधातून त्यांना दोन वर्षांची मुलगीही झाली. दरम्यान, गुरुवारी पूजा हिची आई नवीन मोंढ्याकडील हिंदनगर येथे राहत असलेल्या मुलाच्या घरी गेली होती. सायंकाळी तिने गणेश विसर्जन पाहून ७ वाजेच्या सुमारास घरी आली असता, पूजा ही पलंगाखाली पडलेली दिसली. याप्रसंगी तिला आवाज दिला असता, ती काहीच बोलली नाही म्हणून तिच्या आईने जवळ जाऊन पाहिले असता, तिच्या जवळ सीसीटीव्हीचे वायर व तिच्या गळ्यावर व्रण दिसले. नंतर उचलून पाहिले असता, तिचा गळा दाबल्याचे निदर्शनास आले. या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम हे करीत आहेत. जिल्ह्यात चालू वर्षात मोठ्या प्रमाणात खुनाचे गुन्हे घडत आहेत. पोलिस प्रशासनाकडून गुन्हे उघड केले जात आहेत. परंतु, वारंवार होणाऱ्या या खुनाच्या घटनांमुळे जिल्हा हादरला आहे.

यापूर्वीच दिली तक्रार, पोलिसांचे झाले दुर्लक्ष
मृत विवाहितेच्या आईने अमोल पाठक यांची पहिली पत्नी व तिचा मुलगा उज्ज्वल हा नेहमीच घरी येऊन धमक्या देत होते. याप्रकरणी वर्षभरापूर्वीच चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. पूजा हिच्या जीवितास धोका असल्याने तिची आई लताबाई सुफिलाल मेहरा या तिच्यासोबत राहत होत्या. तीन महिन्यांपूर्वीच पूजा घरात झोपलेली असताना काचा फोडून कुणीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, याप्रसंगी घरातून त्यांना वायर मारल्यामुळे तेव्हा ते पळून गेले होते. परंतु, या प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे हा खुनाचा गुन्हा घडला आहे.

डीव्हीआरही पळवला : घटनास्थळी खुनाचा काही पुरावा राहू नये म्हणून परिसरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाच्या विविध पथकांनी येऊन पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...