आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोणार येथील महिलेचा दोन मुलांसह खून; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - कंधार तालुक्यातील गोणार येथील महिलेचा तिच्या दोन मुलांसह खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली. या प्रकरणी कंधार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

कंधार तालुक्यातील गोणार येथील शरद पंडित पवळे (अंदाजे ३२) याचे लग्न दहा वर्षांपूर्वी रंजना हिच्याशी झाले. लग्नानंतर त्यांना दिग्विजय व वैष्णवी अशी दोन मुले झाली. परंतु रंजनाला नवऱ्यासह सासरची मंडळी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत. गेल्या काही दिवसांपासून तिला माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी छळण्यात येत होते. यासाठी घरात अनेकदा वादही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रंजना शरद पवळे (२७)  व मुलगा दिग्विजय (९) व मुलगी वैभवी (६) हे रविवारी रात्री ९ वाजेपासून बेपत्ता होते. त्यांच्या शेताजवळ असलेल्या एका विहिरीत  सोमवारी सकाळी या तिघांचेही मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीला आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात शरद पंडित पवळे, मैनाबाई पंडित पवळे व सुनीता मनोहर पवळे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ व ४९८ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.