आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या बँक खात्यावर अचानक आले 3.10 लाख रुपये; कर्ज फेडले, पतीला घेऊन दिली बाइक, काही मिनिटांतच पडले सुखांवर विरजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुरी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभर कोट्यावधी लोकांनी जनधन खाते उघडले. झीरो बॅलेन्स अकाउंट असलेल्या या खातेधारकांमध्ये एक अफवा उडाली होती. पंतप्रधान मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कथितरित्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील असे म्हटले होते. तीच रक्कम या जनधन खात्यांवर येणार असा त्यांचा गैरसमज होता. मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील करैरा तालुक्यात राहणाऱ्या एका महिलेच्या जनधन खात्यावर अचानक 3 लाख 10 हजार रुपये जमा झाले. खात्यावर एवढी रक्कम पाहून हे पैसे मोदींनीच जमा केले असावेत असे तिला वाटले. मग, काय तिने आनंदात ती संपूर्ण रक्कम खर्च केली. यानंतर खरी माहिती समोर आली तेव्हा तिला धक्काच बसला.


ममता कोली नावाच्या या महिलेने जनधन अकाउंट उघडले तेव्हापासून एका रुपयाचा सुद्धा व्यवहार केला नाही. आणि आज त्या खात्यावर 3.10 लाख रुपये जमा झाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिने ती सगळीच कॅश काढण्याचा निर्णय घेतला. मग, यातूनच आपल्या कुटुंबावर असलेले कर्ज फेडले. पती सुरेंद्र कोली याला एक नवीन बाइक घेऊन दिली. उर्वरीत पैशातून स्वतःसाठी सोन्याचे दागिने विकत घेतले. यानंतर जेव्हा तिच्या घरावर पोलिस येऊन धडकले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. हे पैसे दुसऱ्या एका गरीबाचे होते आणि चुकून ते महिलेच्या खात्यावर जमा झाले होते. एवढा खर्च करून तिच्याकडे फक्त 85 हजार रुपये उरले होते. आता बँकेने तिला नोटीस पाठवून संपूर्ण रक्कम परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ठराविक वेळेच्या आत ते पैसे जमा केले नाही तर तिच्यावर पोलिस कारवाई केली जाणार आहे.


अशी झाली चूक...
याच जिल्ह्यातील सिरसौद गावात राहणारे दुकानदार अनिल नागर यांनी आपल्या बँक खात्याशी चुकून ममता कोली या महिलेचा आधार क्रमांक जोडला होता. त्यामुळेच बँकेत जमा केलेली रक्कम अनिलच्या खात्यावर न जाता ममताच्या खात्यावर गेली. ममताने कियोस्क सेंटरवर अंगठ्याचे ठसे लावता-लावता संपूर्ण रक्कम बाहेर काढली. यानंतर जेव्हा अनिलने आपल्या भावाला पैसे काढण्यासाठी बँकेत पाठवले, तेव्हा त्याच्या खात्यावर पैसेच नव्हते. यानंतर अनिलने बँक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.


ट्रॅक्टर विकून मुलीच्या लग्नासाठी जमा केले होते पैसे
अनिल नागर यांचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांनी आपले एक ट्रॅक्टर विकून 3.5 लाख रुपये गोळा केले होते. हीच रक्कम त्यांनी बँक खात्यावर जमा केली होती. येत्या 5 मे रोजी त्यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यांनी लग्नाच्या खरेदीसाठी 27 फेब्रुवारी रोजी आपल्या भावाला बँकेतून पैसे आणण्यासाठी पाठवले होते. परंतु, बँकेने त्यांच्या खात्यावर एक रुपया सुद्धा नाही असे सांगितले. यासंदर्भात पोलिस आणि बँकेकडे तक्रार देण्यात आली आहे. बँकेने महिलेकडून 85 हजार रुपये वसूल केले आता उर्वरीत रक्कम वसूल करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...