आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने नियतीशीही ‘समझोता’ केला नाही, पाकमधून पतीला आणले परत,  लहानुबाईंचा ‘अभिनंदनीय’ संघर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले. कारण तसा आंतरराष्ट्रीय दबाव होता. पण नगर जिल्ह्यातल्या वडगावच्या शेतकऱ्यासाठी  कोणाचा दबाव असणार? दिल्लीहून चुकून ‘समझोता एक्स्प्रेस’मध्ये बसल्याने लाहोरला गेलेले भानुदास कराळे पाकिस्तानी तुरुंगात अडकून पडले. बाहेर पडण्याची कोणतीच शक्यता नव्हती. पण त्यांची अशिक्षित पत्नी लहानुबाई पदर खोचून उभी ठाकली. आणि तिच्या सत्यवानाला मायदेशी आणूनच ही सावित्री गप्प बसली.


गोष्ट तशी नऊ-दहा वर्षांपूर्वीची. मात्र, ताज्या संदर्भाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. भानुदास कराळे यांना ऑगस्ट २०१० मध्ये पुणे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना ते आवडले नाही. रागाच्या भरात रेल्वेत बसलेे आणि थेट दिल्लीला पोहोचले. दोन दिवस राहून ते परत निघाले आणि चुकीने ‘समझोता एक्स्प्रेस’मध्ये बसले आणि लाहोरला पोहोचले. पाक पोलिसांनी त्यांना भारतीय गुप्तहेर ठरवून थेट कोट लखपत तुरुंगात डांबले. इकडे त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. घरच्यांनी ते हरवल्याची तक्रार दिली. एक वर्ष झाले. गावकरी, नातेवाइकांनी आशा सोडल्या होत्या. मात्र, लहानुबाईंना ते जिवंत आहेत आणि एक दिवस सुखरूप परत येतील, असा विश्वास होता.  दरम्यान, एक दिवस पोस्टमन ‘भानुदास कोठे राहतात?’ असे विचारत आला. त्या वेळी लहानुबाई आनंदल्या, पण पूर्ण पत्ता नसल्याने ते पत्र त्यांना मिळाले नाही. हे पत्र आमचेच आहे आणि ते माझ्याकडेच येईल, असे त्यांनी विश्वासाने सांगितले. काही दिवसांनी दोन पत्रं घेऊन तोच पोस्टमन आला. तेव्हा पती पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचे त्यांना कळले. ‘मी पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे. मला सोडवा.’ असे भानुदास यांनी लिहिले होते. दुसरे पत्र पंजाबचे नीरज शर्मा यांचे होते. त्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली होती. कुटुंबीयांनी नीरज शर्मांशी संपर्क केला व माहिती घेतली. 
  

लहानुबाई अस्वस्थ झाल्या. तो दुश्मनाचा देश आहे, एवढंच त्यांना माहीत. त्यानंतर त्यांनी पतीच्या सुटकेसाठी पदर खोचला. आधी त्यांनी आमदार-खासदाराकडे पाठपुरावा केला, पण फायदा झाला नाही. शेवटी सरकारदरबारी चकरा मारत हवी ती माहिती, कागदपत्रे, शेकडो पुरावे देत पतीला सोडवण्यासाठीचा संघर्ष सुरू ठेवला. लाहोर उच्च न्यायालयाने भानुदासला सोडण्याचे आदेश दिले. पण कागदपत्रे आणि प्रकियेच्या विलंबामुळे त्यांची परतण्याची प्रक्रिया रखडली. भारतीय उच्चायुक्तांनी राष्ट्रीयत्वाचा पुरावा पाठवल्यानंतर २०१२ मधे त्यांना परत पाठवले गेले. या प्रवासात त्यांना सरहदचे संस्थापक संजय नहार, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर,  भाऊ दत्तात्रय, मुलगा रोहिदास, पुतण्या नितीन यांनी मोठी मदत केली.


लहानुबाईंचा ‘अभिनंदनीय’ संघर्ष
आज हे दांपत्य आनंदात आहे, पण त्यांच्या त्या जखमा अजूनही ओल्या आहेत. लहानुबाई सांगतात, ‘पती कैदेतून सुटून आला तरी कित्येक वर्षे हिंदीतूनच बोलायचे. त्यांच्या मनात आतापर्यंत भीती होती. तुरुंगातील कामाचे पैसे अधिकाऱ्यांनीच ठेवून घेतल्याचे सांगायचे. उठ म्हटलं की उठायचे अन्‌ बस म्हटले की बसायचे. आता कुठे थोडे थोडे आयुष्य रुळावर आलेय.’

बातम्या आणखी आहेत...