Home | Maharashtra | Pune | Women arrested in the case of burglary  

घरफोड्या करणारी अट्टल महिला गुन्हेगार जेरबंद; साताऱ्यातून पुणे, पिंपरीत येऊन करायची चोऱ्या 

प्रतिनिधी | Update - Feb 12, 2019, 08:45 AM IST

आरोपी महिला काही वर्षांपूर्वी निगडी ओटास्किम परिसरात राहून कचरावेचक म्हणून काम करत होती.

  • Women arrested in the case of burglary  

    पुणे- साताऱ्यातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येऊन घरफोड्या करणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगाराला पोलिसांनी स्वारगेट येथे अटक केली. तिच्या ताब्यातून घरफोडीच्या चार गुन्ह्यांतील एकूण २ लाख ३३ हजार रुपये किमतीचे ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी दिली. लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (३१, रा. नावररस्ता, नाडे, ता. पाटण, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

    लक्ष्मी काही वर्षांपूर्वी निगडी ओटास्किम परिसरात राहून कचरावेचक म्हणून काम करत होती. कचरा गोळा करत असताना तिला काही छोट्या चोऱ्या करताना पोलिसांनी अटक केली होती. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून तिने सातारा येथे दुसरे लग्न केले आहे. तिची चार मुले ही इस्लामपूर, सांगली येथे सरकारी वसतिगृहात राहतात. चोरीच्या एका गुन्ह्यातून सुटका झाल्यानंतर दीड वर्षापूर्वी ती सातारा येथे राहण्यास गेली. मात्र, त्यानंतर पुण्यात येऊन ती घरफोड्या करत होती. एका खबऱ्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. दरम्यान, लक्ष्मी ही अट्टल गुन्हेगार असून तिच्याविरेाधात पुण्यातील विविध ठाण्यांत १२ गुन्ह्यांची नोंद आहे.

    बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या चार जणींना अटक
    पीएमपीएल व एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चार महिलांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. शांता राजू जाधव (५०, रा. मुंढवा, पुणे), चंद्रभागा बजेंत्री ऊर्फ गायकवाड (४५, रा. मुंढवा, पुणे) आणि सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव (३०, रा. व्हटगीगाव, सोलापूर) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. सुचित्रा जाधव ही चंद्रभागा गायकवाड हिची मुलगी असून सोलापूरवरून पुण्यात येऊन ती आईसोबत चोऱ्या करत होती. यापूर्वीच्या मायलेकींच्या गुन्ह्यांचा पोलिस तपास करत आहेत.

Trending