आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणाच्या वादावरू मैत्रिणीला पेटवले, शिंदखेड्यातील प्रकार; आरोपी महिलेला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- जेवणाच्या वादावरून एका महिलेने अापल्या मैत्रिणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना शिंदखेडा येथे घडली. जळीत महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पेटवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. जळीत महिला शिरपूरची रहिवासी असून रॉकेल अोतून पेटवणारी तिची मैत्रीण अकोला येथील रहिवासी असून तिला अटक करण्यात आली. 


शिरपूरमधील वनिता नारायण ठाकरे (३०) ही महिला शिंदखेडा येथे आली होती. शिंदखेडा बसस्थानक परिसरात राहणारी कमलबाई यांच्या घरी ती मुक्कामी होती. वनिता रात्री जेवण करत असताना मुन्नी सय्यद आलम ही तेथे आली. घरातून येताना तिने बाटलीमध्ये रॉकेलही आणले हाेते. वनिताला कोणतीही संधी न देता मुन्नीने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. वनिता हिच्यावर शिंदखेडा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर तिला शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या घटनेत वनिता गंभीररीत्या भाजली आहे. तिच्या जबाबावरून शिंदखेडा पाेलिस ठाण्यात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर शिंदखेडा पोलिसांनी मुन्नीला अटक केली. तिला गुरुवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने तिला सोमवार (दि. १३) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


दोघींमध्ये होती मैत्री 
संशयित आरोपी मुन्नी अकोला येथील रहिवासी असून वनिता शिरपूरला राहते. यापूर्वी दोघी शहाद्यात सोबत राहत होत्या. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. शहाद्याहून वनिता शिरपूरला गेली, तर मुन्नी शिंदखेड्याला आली. कामानिमित्त वनिता शिंदखेड्याला आली असताना हा प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


दोघींमध्ये वाद झाला 
घटनेनंतर वनिताचा जबाब घेण्यात आला आहे. तिच्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे. जेवणाच्या कारणावरून दोघींमध्ये वाद झाला होता. वनितानेही जबाबात तसे नमूद केले आहे. मुन्नीला अटक करण्यात आली आहे. 
- बी. जे. शिंदे, पोलिस उपनिरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...