आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला मोठे खिंडार; महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, रुपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पुण्यात घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादीची गळती थांबायचे नावच घेत नाहीये. नुकतंच अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपातील प्रवेशावर शिक्कामोतर्ब केलाय, त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील आपल्या सर्व पदांचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांच्यानंतर आता राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबत  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात घोषणा केली.

 


येत्या 30 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता राजकिय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

 

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. दरम्यान, फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर काँग्रेसचीही गळती सुरुच आहे. 30 जुलैला कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मधुकर पिचड यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही भाजपात जात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


 

विदर्भातही राष्ट्रवादीला धक्का 
मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला विदर्भातही मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश जवळपास पक्का झालाय. मनोहर नाईक हे राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नाईक घराण्याच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.