Home | Maharashtra | Vidarva | Akola | Women demand at police to stop liquor

महिलांनी पोलिसांना मागितली दारू बंद करण्याची ओवाळणी

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 12:49 PM IST

हातात आेवाळणीचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५० तर कुठे ७० महिला पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र

 • Women demand at police to stop liquor

  अकोला- हातात आेवाळणीचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५० तर कुठे ७० महिला पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक पोलिस स्टेशनवर दिसत होते. गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधत गावांमधील महिला पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या वेळी महिलांनी राखी बांधली नाही, तर पोलिसांना ओवाळणीही मागितली. ओवाळणीत महिलांनी पोलिसांना गावातील दारू बंदीचे, गावाचे दारूपासून रक्षणाचे वचन मागितले.गडचिरोलीत २७ मार्च १९९३ पासून दारूबंदी आहे, परंतु अवैध मिळणाऱ्या दारूमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


  नवऱ्याने पैसा उडवणे असो, किंवा गावात शिवीगाळ होणे असो, याचा सगळ्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो.बहिणींची रक्षा करण्याचे वचन देण्याचा आणि वचन घेण्याचा सण म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा होतो. त्याच निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील महिलांनी पोलिस स्टेशनमधील पोलिसांना राख्या बांधल्या. 'भाऊ, माझ्या परिवाराचे, गावाचे दारूपासून रक्षण कर. रक्षा बंधनाची ओवाळणी दे, गावातील दारू बंद कर', असे आवाहन या महिलांनी पोलिसांना केले. या कार्यक्रमानंतर पोलिसही भारावून गेले. काही ठिकाणी पोलिस भावनिक झाले. सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी १५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करेन, असं वचनच भगिनींना दिले, तर गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, भगिनींनी ओवाळणीच्या रुपात पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, असे उद्गार काढले.


  भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले व ते भगिनींच्या उपस्थितीतच नष्ट केले. सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, देसाईगंज या तालुक्यातील पोलिस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जाऊन आपल्या पोलिस भाऊंना दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली.


  पोलिसांनी दिले वचन
  महिलांच्या स्वाक्षऱ्यांचेकार्ड पोलिसांना दिले. 'तुमच्या गावातील दारू बंद करू' असे वचन देणारे कार्ड पोलिसांनीही स्वाक्षरी करून ओवाळणीत महिलांना दिले.


  डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने मुक्तिपथ
  डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने मुक्तिपथ अभियान सुरू आहे. त्यात गावात संघटना स्थापन केल्या असून, दारू, तंबाखू बंदीसाठी संघटनेतील सदस्य प्रयत्न करतात. मुक्तिपथ संघटनेतील महिलांनी पोलिसांना राख्या बांधून दारू बंदीचे आवाहन केले.

Trending