आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 29 शहरांत रातरागिणींनी स्वयंस्फूर्तीने भेदले अंधाराचे साम्राज्य, नाईट वॉकला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळच्या नाईट वॉकमध्ये हजाराे महिलांनी सहभाग नोंदविला. तिरंगा चौकातून निघालेला नाईट वॉक शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत शेवटी तिरंगा चौकात समारोप करण्यात आला. समारोपानंतर उपस्थित असलेल्या महिलांसह मुलींनी मोबाईलची बॅटरी लावून उत्सव साजरा केला. छाया : महेश वाघमारे - Divya Marathi
यवतमाळच्या नाईट वॉकमध्ये हजाराे महिलांनी सहभाग नोंदविला. तिरंगा चौकातून निघालेला नाईट वॉक शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत शेवटी तिरंगा चौकात समारोप करण्यात आला. समारोपानंतर उपस्थित असलेल्या महिलांसह मुलींनी मोबाईलची बॅटरी लावून उत्सव साजरा केला. छाया : महेश वाघमारे

औरंगाबाद : 'मौन सोडू, चला बोलू' या 'दिव्य मराठी'च्या अभियानांतर्गत रविवार, २२ डिसेंबर रोजी वर्षातल्या सगळ्यात मोठ्या रात्री आयोजित केलेल्या 'नाइट वॉक' ला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या विभागांत सर्व स्तरांतील, क्षेत्रांतील महिला विविध संघटना, संस्थांनी पुढाकार घेत सुमारे २९ शहर, गावात मिळून ३६ ठिकाणी एक लाखाहून अिधक रातरागिणींनी स्वयंस्फूर्तीने अंधार भेदला. रंगारंग कार्यक्रम सादर करतानाच, आसमंत भेदणाऱ्या घोषणा देत जल्लोषात सहभाग नोंदवला. एरवी रात्री घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिला कार्यक्रम संपल्यानंतरही मोठ्या उत्साहाने वावरत होत्या.
कधी पोटच्या मुलीवर बलात्कार होतो, तर कधी नराधमांच्या तावडीतून आईही सुटत नाही. गर्भात ती असुरक्षित, रस्त्यावर एकाकी आणि घरातही अगतिक. एवढं होऊनही अशी श्वापदं मोकाट फिरत असतात आणि जेरबंद केलं जातं ते महिलेलाच. तुम्ही कपडे असे घालू नका, तुम्ही रात्री घराबाहेर पडू नका. सातच्या आत घरी पोहोचा. ही व्यवस्थाच लाथाडण्याची आणि असे सांगणाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची वेळ आली आहे. आता आक्रमकपणे या अंधारावर मात करावी लागणार आहे. 'ती' कोणासोबत बोलते, कोणासोबत चालते, एवढीच चर्चा करत जे तिला अग्निपरीक्षा घ्यायला सांगतात, त्यांना हे विचारलं पाहिजे की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? स्त्रीच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श करण्याचा अधिकार यांना कसा मिळाला? आज महिला बोलू लागली आहे. त्यामुळे किमान नोंद तरी होते आहे या गुन्ह्यांची. अशी व्यवस्था झुगारण्यासाठी या महिला रस्त्यावर उतरल्या. दिव्य मराठी'ने या उपक्रमासाठी रणरागिणींना साद घातली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पोलिसांचे पथनाट्य

जालना पोलिस अधीक्षकांनी कलावंत असलेल्या १५ पोलिसांची टीम वेगळी केली होती. त्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच पोलिस बँडच्या देशभक्तिपर गाण्यांनी वेगळी उंची दिली. बीड, औरंगाबाद आणि अनेक शहरांत एरवी रात्री बाहेर पडायला टाळणाऱ्या महिलांनी कार्यक्रम संपल्यानंतरही परिसरात फिरण्याचा आनंद घेतला तसेच कुल्फी, चहा, पान तसेच किरकोळ विक्रेत्याकडून विविध खाद्यपदार्थ घेत रात्रीचे गाव अनुभवले.

'नाइट वॉक' म्हणजे जगण्याचा जल्लोष

मुंबईत खारघर, पनवेल येथे पाच ठिकाणी पुण्यात दोन ठिकाणी तसेच औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, बीड, उस्मानाबाद, जालना, नांंदेड, धुळे, भुसावळ, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, माजलगाव, देऊळगावराजा, कोल्हापूर, सातारा, सांगली, ओझर, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या वडूज या ठिकाणी हा नाइट वॉक यशस्वी झाला. नांदेड, ओझर, सिंहगड पुणे, वडूज या ठिकाणी रातरागिणींनी स्वयंस्फूर्त नाइट वॉक यशस्वी केला. अमरावती जिल्ह्यातील काही महिला पर्यटनासाठी पुण्यात गेल्या होत्या त्यांनी सिंहगड रस्त्यावर 'नाइट वॉक' केला. दिव्य मराठीने २२ शहरांत आयोजन केले होते. हा 'नाइट वॉक' म्हणजे जगण्याचा जल्लोष. स्त्रीत्वासोबत माणूसपणाचे सेलिब्रेशन, रंगारंग कार्यक्रम, धमाल मैफल, जमवत रात्रीच्या अंधारावर मात केली. वाॅकच्या शुभारंभापूर्वीच विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून स्त्रीशक्तीने आपली ताकद दाखवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शहरात केले होते. शहरात रात्री उशिरापर्यंत काम करून घरी परतणाऱ्या पाच विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या पाच प्रातिनिधिक रणरागिणींनी मशाल पेटवून या वॉकला प्रारंभ केला.

सौंदर्यवतींचा सहभाग

नाशिक सौंदर्य स्पर्धेत विजेत्या रातरागिणींनी मुकुट परिधान करून सहभाग नोंदवला. अमरावतीसह काही शहरांत महिला आपल्या तान्ह्या बाळाला घेउन सहभागी झाल्या होत्या. या नाइट वॉकमध्ये सहभागी महिला, युवतींवर सोलापूर नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलने डफरीन चौकात पुष्पवृष्टी केली. गुलाबाच्या पाकळ्या उधळल्याने रस्त्यावर पाकळ्यांचा गालिचाच तयार झाला होता. त्यानंतर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चौकातील जड वाहतूक थांबवून रणरागिणींना रस्ता मोकळा करून दिला. निसर्गावर प्रेम करणाऱ्या युवकांच्या या उपक्रमाने वातावरण बदलून गेले होते.

 

बातम्या आणखी आहेत...