आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दुचाकीला धडक; मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर अपघातांची श्रृंखला थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी स्कूटीवर शिवाजीनगरहून पैठण रोडकडे जाणाऱ्या दांपत्याला ट्रकने एमआयटी चौकात ठोकरले. यात गाडीवर मागे बसलेली महिला ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पती जखमी झाला आहे. स्नेहल मनोज बावळे (२८, गोल्डन सिटी, इटखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलादिनीच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड बायपासवर मागील वर्षभरात आतापर्यंत तब्बल १६ बळी गेले आहेत.

 

किराणा साहित्य खरेदीसाठी बावळे दांपत्य स्कूटीवर (एमएच २० डीयू ३९२७) शिवाजीनगरमध्ये गेले होते. किराणा साहित्य जास्त असल्याने काही पिशव्या गाडीच्या हँडलला तर काही दोघांच्या मध्ये सीटवर ठेवलेल्या होत्या. घराकडे जाताना दुपारी १.२५ वाजता एमआयटी चौकात सिग्नलच्या अलीकडे रॅम्बलिंग स्पीडब्रेकरवर स्कूटी येताच पैठण रोडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १८ बीए २७४९) ठोकरले. यात स्नेहल ट्रकच्या दिशेने कोसळल्या व मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. मनोज डाव्या बाजूला पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

 

या अपघातानंतर ट्रकचालकाला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. घटनास्थळी मांसाचे तुकडे आणि रक्त पडलेले होते. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल आडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर स्नेहल यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला, तर मनोज यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मनोज बावळे हे नोकरीनिमित्त सहा वर्षांपूर्वी उस्मानाबादहून शहरात राहायला आले. गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिराजवळ ते किरायाने राहत होते. त्यानंतर त्यांनी इटखेडा भागात फ्लॅट खरेदी केला आणि ३ महिन्यांपासून तेथे राहायलाही गेले होते. मनोज हे पैठण रोडवरील अजिंठा फार्मा कंपनीत स्टोअर मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत, तर स्नेहल या गृहिणी होत्या. हा अपघात घडला त्या वेळी त्यांची मुले शाळेत गेली होती.

 

बीड बायपास सातपदरी करण्याचा प्रस्ताव ५ महिन्यांपासून प्रलंबित

बीड बायपासवरील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी हा रस्ता सातपदरी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्य शासनाला पाठवला होता. या प्रस्तावाला ५ महिने झाले तरीही शासनाकडून कुठलीही हालचाल झालेली नाही. ११२ कोटी रुपये अंदाजित किमतीचा हा प्रस्ताव होता, तर दुसरीकडे या रस्त्यालगत असलेला सर्व्हिस रोड करण्याबाबत मनपाने जणू 'टाइम किलर'चीच भूमिका घेतली आहे. परिणामी बायपासवर अपघाताची संख्या वाढतच आहे.

 

धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे बीड बायपास. या रस्त्यावरून आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. २४ तासांत तब्बल १३ हजार अवजड वाहने या रस्त्यावरून धावतात. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम हा १३ किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शहरातील नागरी वसाहती झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक आणि अवजड वाहतूक या रस्त्यावर एकत्रच सुरू आहे. अॅप्रोच रस्त्यांमुळे जागोजागी अरुंद चौफुल्या आहेत. सरळ जाणारे जेवढे, तेवढेच रस्ता ओलांडणारेही आहेत. यात गडबड, अमर्याद वेग, वाहतूक नियम मोडल्याने अपघात होतात आणि बळी जातात.

 

बायपासवर मागील वर्षभरात तब्बल १६ बळी गेले आहेत. यासंदर्भात दै. दिव्य मराठीच्या डीबी स्टारने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर सातारा, देवळाई, इटखेडा, आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलने केली.

 

असा आहे सातपदरीचा प्रस्ताव
बीड बायपाससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १०० फूट रुंद जागा संपादित केलेली आहे. यातील केवळ ५० फूट जागेवर डांबरीकरणाच्या चार लेन आहेत. उर्वरित ५० फूट जागा जणू वापरात नसल्यासारखी आहे. त्यामुळे उर्वरित ५० फूट जागेमध्ये अजून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड लेन वाढवून एकूण सातपदरी रस्ता करण्याचा हा प्रस्ताव होता. म्हणजे एका बाजूने साडेतीन लेन यात असतील. साडेतीनपैकी दोन लेन अवजड वाहनांसाठी, एक लेन कारसाठी आणि राहिलेली अर्धी लेन दुचाकींसाठी वापरता येईल. याशिवाय देवळाई चौक, संग्रामनगर उड्डाणपूल आणि एमआयटी चौकामध्ये भुयारी मार्गाचाही या प्रस्तावात समावेश होता. एकूण १२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.

 

सर्व्हिस रोडही रखडलेला
विकास आराखड्यामध्ये बीड बायपासलगत दोन्ही बाजूंनी प्रत्येक ५० फूट रुंदीचा सर्व्हिस रोड दाखवलेला आहे. जिथे अधिकृत लेआऊट आहेत तिथे विकासकांनी सर्व्हिस रोडची जागा सोडलेली आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी घरे, व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या. सर्व्हिस रोडसाठी भूसंपादनच अजून झालेले नाही. भूसंपादन करण्यासाठी मनपा आयुक्तांनी मालमत्ताधारकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या. मात्र, या सुनावण्यांच्या पुढे काय, याबद्दल आयुक्त निपुण विनायक एक शब्दही बोलत नाहीत. लोकांचे जीव असेच जात राहतील, मनपाकेवळ बघत बसेल हे किती दिवस?

 

सर्व्हिस रोड करण्याबाबत आता विशेषाधिकार वापरून आयुक्तांना आदेशित करावे लागेल. आयुक्तांनी सुनावण्या घेतल्या आहेत, पण पुढे काय झाले याबद्दल आयुक्तांना जाब विचारतो.

- नंदकुमार घोडेले, महापौर

बातम्या आणखी आहेत...