आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणाचा बळी.. झाकण नसलेल्या टाकीत पडल्याने यावलमध्ये महिलेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- भुसावळ टी-पाँइंट जवळील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलालगत, झाकण नसलेल्या भूमिगत सांडपाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह आढळल्याचा प्रकार रविवारी, दुपारी 3.30 वाजता उघड झाला. सायंकाळी मृत महिलेची ओळख पटली. कमलबाई भगीरथ महाजन (वय- 60, रा.धानोरा, ता.चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गुरुवारी फैजपूरच्या यात्रेत गेल्या होत्या, परतताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

 

शेतकी संघाच्या व्यापारी संकुलाच्या पूर्वेस गटारीला लागून सांडपाण्याची भूमिगत टाकी आहे. त्या टाकीला झाकण लावण्यासाठी दीड बाय दीड आकाराची जागा झाकण लावण्यासाठी सोडली आहे. मात्र, टाकीवर झाकण नसल्याने त्यात पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी उघड्या टाकीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांनी डोकावून पाहिले असता त्यात महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसला. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी, पालिकेचे दुर्गादास चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह धानोरा येथील कमलबाई महाजन (वय ६०)यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेचा नातू आकाश महाजन याने यावल ग्रामीण रुग्णालय गाठून ओळख पटवली. सुधाकर पुंजा भिल यांच्या माहितीवरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास हवालदार गोरख पाटील करत आहेत.

 

अशी घडली घटना
कमलबाई महाजन गुरूवारी फैजपूर येथील खंडोबाच्या यात्रेत गेल्या होत्या. शुक्रवारी फैजपूर येथून धानोऱ्याला जाण्यासाठी बस नसल्याने, भुसावळ टी पॉईंट जवळून रिक्षाने जाण्याचे नियोजन त्यांनी केले असावे. अंधारात व्यापारी संकुल परिसरात येताना टाकीचे झाकण उघडे असल्याने त्या टाकीत पडल्या. त्यातच त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

मृत महिलेच्या नातवाने पटवली ओळख
भूमिगत टाकीवर झाकण नसल्याने कमलबाई महाजन यांना जीव गमवावा लागला. तीन दिवसांपासून त्या घरी न आल्यामुळे मृत कमलबाई यांचा नातू आकाशने तपास सुरु केला होता. यावल पोलिसांसोबत त्याने याबाबत चर्चा केली होती. रविवारी घडलेल्या घटनेनंतर त्यानेच ओळख पटवली. मृत कमलबाई यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...