आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत दिला जुळ्या मुलांना जन्म; नांदेड-गंगानगर एक्स्प्रेसमधील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू - हिंगोली येथील एक दांपत्य मथुरा तीर्थ यात्रेसाठी जात असताना गरोदर मातेला अचानक धावत्या रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्या. या वेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या  सेलू जिल्हा परभणी येथील दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनीने प्रसंग ओळखून स्त्रीरोग तज्ञाची भूमिका आपल्या डॉक्टर बहिणीच्या मदतीने निभावली. त्यामुळे धावत्या रेल्वेत त्या मातेने जुळ्या मुलांना यशस्वीरीत्या जन्म दिला. या धाडसाचे कौतुक रेल्वेतील सहप्रवाशांनी केले. 


सेलू येथील सुकन्या अण्णासाहेब भाबट ही विद्यार्थिनी गंगानगर येथील दंत महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी  सोमवारी(२० मे ) सुकन्या भाबट ही पूर्णा रेल्वे स्थानकाहून दुपारी १२ वाजता गंगानगर एक्स्प्रेसमध्ये जी-वन या कोचमध्ये बसली होती. पूर्णा स्टेशन सोडल्यानंतर ही धावती रेल्वे गाडी खांडवा रेल्वेस्थानक परिसरात पोहोचण्यापूर्वी  रेल्वेतील टी. सी. चे दूरध्वनीवरील संभाषण सुकन्या भाबट हिने ऐकले आणि तत्काळ प्रसूतीवेदना होणाऱ्या मातेजवळ पोहोचली.  समोरील प्रसंग पाहून सुकन्या भाबट हिने सेलू येथील स्त्रीरोग तज्ञ बहीण डॉ. अंजली भाबट यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्या महिलेला प्रसूतीसाठी मदत केली.


हिंगोली येथील सविता चंद्रभान शर्मा व त्यांचे पती चंद्रभान शर्मा हे दांपत्य मथुरा येथे तीर्थयात्रेला जात होते. सविता शर्मा या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. धावत्या रेल्वेत त्यांना अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्या वेळी सुकन्या भाबट यांनी आपल्या स्त्रीरोगतज्ञ बहिणीचे दूरध्वनीद्वारे  मार्गदर्शन घेऊन यशस्वीपणे बाळंतपण केले. विशेष म्हणजे या मातेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सुरुवातीला एक मुलगा जन्मला त्यानंतर काही वेळाने दुसरा मुलगा जन्माला आला. पहिला मुलगा जन्मल्यानंतर रडला, त्याची हालचाल होती. वैद्यकीय दृष्टीने तो फीट होता.  मात्र दुसरा मुलगा जन्मला तो रडला नाही, व त्याची हालचाल देखील दिसेना गेली. अशा परिस्थितीत सुकन्या भाबट हिने या मुलाच्या पाठीवर व छातीवर थापटून त्याची हालचाल देखील सुरू केली. सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान डिलिव्हरी झाली. 


दोन्ही मुलांचे अंग गरम पाण्याने स्वच्छ पुसून घेतले. जुळे मुले व माता सुखरुप होती. मात्र काही वेळाने मातेला थकवा जाणवू लागला म्हणून खांडवा रेल्वेस्थानक परिसरात तेथील रेल्वे पोलिस व इतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या मातेला व जुळ्या मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...