आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घूसून महिलेेचा खून, २५० ग्रॅम दागिन्यांसह ८३ हजारांंची रोख लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वलगाव मार्गावरील नमक कारखान्याच्या मागील बाजूला असलेल्या असीर काॅलनीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी तिला ठार करून दोन अालमारी व तिजोरीमधून जवळपास २५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सुमारे ८३ हजार रुपयांची रोख लंपास केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. १८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट व गाडगेनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.ताहेराबानो हाजी आदिल अहमद (६२, रा. असीर कॉलनी) असे मृतक महिलेचे नाव आहे.याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


ताहेराबानो आणि त्यांचे पती आदिल अहमद (कंट्रोलवालेे) यांचा नमक कारखान्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर बंगला आहे. या बंगल्यात ताहेराबानो व आदील अहमद हे वृध्द दाम्पत्य राहतात. त्यांना दोन मुली असून, त्या विवाहीत आहे. त्यापैकी एक मुंबईत तर दुसरी अमरावतीत राहते. ताहेराबानो यांची एक नातेवाईक दुबईला जाणार असल्यामुळे तिला रविवारी दुपारी जेवणासाठी ताहेराबानो यांनी घरी बोलावले होते. त्यामुळे ताहेराबानो यांच्या घरी काम करणारी महिला दुपारी एक वाजताच्या सुमारास घरी आली तर तिला ताहेराबानो या घरातील स्वयपांकगृहाला लागूनच असलेल्या डायनिंग रुममध्ये निपचीत पडलेल्या दिसल्या आणि घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने परिसरातील नागरिकांना हा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. तसेच हाजी आदील अहमद हे सुध्दा घरी आले. त्यानंतर ताहेराबानो यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर घरात येेवून आदील अहमद यांनी पाहिले असता चोरट्यांनी घरातील एका खोलीत असलेली तिजोरी फोडून त्यामधील सोन्याचे जवळपास अडीचशे ग्रॅम वजनाचे दागिने आणि सुमारे ८३ हजारांची रोखसुध्दा लंपास केल्याचे लक्षात आले. तसेच संपूर्ण घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. त्यामुळे चोरट्यांनी घरात येवून चोरी केली व चोरीसाठी प्रतिकार केला म्हणून चोरट्यांनीच ताहेराबानो यांचा गळा आवळून जीवानिशी मारले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. तशी तक्रारही पोेलिसांत देण्यात आली आहे. ताहेराबानो यांच्या शरीरावर कुठेही मारण्याची व्रण नाही, किंवा जखम नाही. तसेच त्यांच्या तोंडातून रक्त नाही तर फेस बाहेर आला होता. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत शवविच्छेदन अहवालानंंतरच सांगता येईल,असे पोलिसांनी सांगितले. 
घटनेची माहिती मिळताच डीसीपी यशवंत सोळंके, एसीपी रणजित देसाई, नागपुरी गेटचे ठाणेदार दिलीप चव्हाण, गुन्हे शाखेचे पीआय प्रमेश आत्राम यांच्यासह गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. या प्रकरणात महिलेचा खून करून लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री गाडगेनगर पोलिसांनी सुरू केली होती. दिवसाढवळ्या घरात जावून महिलेचा खून करून रोख व दागिने लंपास केल्याच्या या घटनेमुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. 
मागील काही दिवसांपासून शहरात दिवसाढवळ्या लूटमारीच्या, चोरी आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच आता भरदिवसा घरात शिरून लाखोंचे सोने व रोख लंपास केल्याने शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ताहेराबानो यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन रविवारी सायंकाळीच करण्यात आले. मात्र, शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. पोलिसांना अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. 
वलगाव मार्गावरील नमक कारखान्याच्या मागच्या बाजूला असीर काॅलनीतील बंगला.मृतक ताहेराबानो. 


दोन संशयित ताब्यात, तिसऱ्याचा शोध सुरू 
या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी संशयावरून एका महिलेसह युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारण घटनेेच्यावेळी सीसीटीव्ही बंद असणे, तिजोरी किंवा कपाट न फोडता चाब्याने ते उघडून रोख व दागिने लंपास करणे, यासर्व बाबी संशयाला जागा देणाऱ्या आहेत. त्यामुळे पोेलिसांनी ताहेराबानो यांच्या घरी नेहमी येणारी एक महिला व एका युवकाला रविवारी सायंकाळीच ताब्यात घेवून त्यांची चौकशी सुरू केली तसेच अन्य एका संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. 


घरात सीसीटीव्ही, मात्र रात्रीपासून रेकॉर्डींग बंद 
आदील यांच्या घरात जवळपास पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीचे फूटेज ताब्यात घेवून तपासणी करण्यासाठी नेले मात्र शनिवारी (दि. १७)रात्री नऊ वाजतापासून रविवारी (दि. १८) दुपारी तीन वाजेपर्यंत सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डींगच झालेले नाही. नेमकी घटना घडण्याच्यावेळी सीसीटीव्हीचे रेकॉर्डींग बंद असल्याने हा पूर्वनियोजित कट आणि परिचित व्यक्तीचे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


खून करून लूट केल्याचा गुन्हा होणार दाखल 
या प्रकरणात प्रथमदर्शनी मृत्यूचे नेमके कारण पुढे आलेले नाही. त्यासाठी आम्हाला पीएम िरपाेर्टची प्रतीक्षा आहे. तुर्तास खून करून लुटीचा गुन्हा दाखल करतो आहे. यशवंत सोळंके, पोलिस उपायुक्त. 

बातम्या आणखी आहेत...