आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या खून प्रकरणी चुलत सासऱ्यास ठोठावली आजन्म कारावासाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- जागा खाली करण्याच्या वादातून सुनेचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्या प्रकरणी चुलत सासऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शेगाव तालुक्यातील भोटा येथील सदर घटना असून हा निकाल शुक्रवार, २८ डिसेंबरला खामगाव न्यायालयाने दिला.
शेगाव तालुक्यातील भोटा येथील शारदा श्रावण घुले वय ३० ही महिला २३ एप्रिल २०१३ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास तिच्या घरी बसलेली असताना तिचा चुलत सासरा निवृत्ती निनाजी घुले हा घरी आला. त्याने शारदाला तुझी राहती जागा खाली करून दे, म्हणत तिच्याशी वाद घातला. त्यानंतर चुलत सासऱ्याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर व डोक्यात मारून तिला ठार केले. अशा आशयाची तक्रार लक्ष्मण निनाजी घुले यांनी जलंब पोलिस ठाण्यात दिली.

 

या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी निवृत्ती निनाजी घुले विरोधात कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष टाले यांनी चौकशी पूर्ण करून तपासाअंती दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी शुक्रवारी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान १३ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश व्ही. एम. पथाडे यांनी निवृत्ती घुले यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता उदय आपटे यांनी काम पाहिले.

 

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्षे सक्तमजुरी
स्थानिक आंबेडकर नगरमधील सचिन महादेव चिम याने ११ मार्च २०१६ रोजी शहरातीलच एका विद्यार्थिनीचा शाळेत जाऊन पाठलाग केला. या वेळी मागून येऊन तू मला अावडतेस तू माझे सोबत का बोलत नाहीस असे म्हणून तिचा उजवा हात पकडून ओढत विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेची तक्रार पीडित युवतीने पोलिस स्टेशनला दाखल केली होती. त्यावरून सचिन चिम याच्यासह तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण विशेष जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त न्यायाधीश एस. एम. बेलकर यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. एकूण सात साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यावरून सचिन चिम यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तर इतरांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणात सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी युक्तिवाद केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...