आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान क्षेत्रात महिलांचे सबलीकरण हवे!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरी क्युरी या जगातील प्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ. सध्याच्या काळात देश तसेच जगात विज्ञान क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर खूप कमी महिला आहेत. कारण अनेक गुंतागुंतीचे आणि अमूर्त प्रश्न महिलांना पुरुषांप्रमाणे करिअरमध्ये पुढे जाण्यापासून रोखत असतात. अर्थात, श्रमशक्तीत मागील दशकात महिलांची संख्या वेगाने वाढली आहे. पण कामाच्या ठिकाणी कर्मचारी म्हणून ज्या अपेक्षा असतात त्यात अजूनही खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. आजही महिलांना काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्याची संधी देणाऱ्या धोरणांची उणीव आहे. मागील शतकात विज्ञान क्षेत्रातील महिलांच्या भूमिकांची शैली बदलली आहे. तंत्रज्ञान क्रांती व इंटरनेटने दुरूनही काम करणे शक्य आहे. त्यामुळे कामाचे स्वरूपही बदलले आहे. पण त्यासाठी महिलांना नोकरी, प्रशिक्षण, प्रमोशन देणे आवश्यक असून त्यांच्या अडचणींनुसार कामाचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. यावर ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा प्रकारे काम करते हे पाहावे लागेल. कारण ही धोरणे जास्त पुरुषकेंद्रित असतात. कामाच्या ठिकाणी शारीरिक अत्याचारसंबंधी धोरण लागू करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही संस्थेत योग्यता निश्चित केल्यास नियुक्त्या, पदोन्नती तसेच संशोधनाचे मूल्यांकन अधिक मजबूत होते. शास्त्रीय संशोधनात, पब्लिकेशन व पेटंटचे नंबर, प्रकार आणि क्वालिटीसोबत सहकाऱ्यांची टिपणीही महत्त्वाची असते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रात समाजासाठी जास्त निर्मिती होत असते. अर्थात याची ठोस आकडेवारी मिळणे कठीण आहे. तसेच ती व्यक्तिपरत्वे बदलत जाते. उदा. विक्री क्षेत्राचे मूल्यमापन प्रदर्शनातील वस्तू आणि सेवा विक्रीतून केले जाऊ शकते, पण विज्ञान क्षेत्रासाठी असे मापदंड नाहीत. महिला वैज्ञानिकांचे वेतन कमी असून त्यांची प्रतिष्ठाही पुरुष वैज्ञानिकांच्या तुलनेत कमी असते. विज्ञान पदवीधर महिलांना पुरुषांच्या तुलनेत क्वचितच चांगल्या नोकऱ्या मिळतात. बहुतांशांना शिकवण्याचे काम मिळते. अनुदान मिळवतानाही महिलांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. अनुदानासाठी त्यांचे अर्जही कमीच असतात. हाय प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या विदेशातील परिषदा किंवा नोकऱ्या, प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणचे संपर्क तसेच मार्गदर्शकाची गरज असते. एका अभ्यासानुसार, महिलांकडे असे संपर्क कमी असतात. त्यामुळे त्यांना असे अनुभव कमी मिळतात. विकासात्मक अनुभव व त्यासंबंधीच्या घटनाक्रमांपर्यंत त्यांची पोहोच कमी होते. इथेच त्यांच्यावरील विश्वासार्हताही कमी होते. मार्गदर्शक नेहमीच ठरावीक क्षेत्रात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. विकासाच्या संधी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विश्वासार्हतेची हमी देण्यासाठी हे महत्त्वाचे असतात. अनेक यशस्वी महिलांना आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अशा मार्गदर्शकांची साथ मिळालेली आहे. एखाद्या संस्थेची संस्कृती कर्मचाऱ्यांवर प्रभावी ठरत असते. संस्कृती ही मूल्यांद्वारे प्रभावित होते. ती महिलांवर नकारात्मक परिणाम करू शकते. स्टिरियोटायपिंग व भेदभावाकडे महिला व पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात. याचा वेगवेगळ्या पद्धतींनी कामावर परिणामही होतो. एखाद्या संस्थेची संस्कृती ही तेथील सदस्यांचा खरेपणा, मूल्य, प्रतीक आणि परंपरांनीही अधोरेखित होत असते. यातून वर्तणुकीचे मानदंड व अपेक्षा निर्मिती होते. काम करण्याचे दीर्घ तास, कार्यालयातील हजेरी, प्रतिस्पर्धा, कामाला प्राधान्य, कामासाठीच जगणे हा आदर्श ही मूल्ये त्यातूनच तयार होतात. अर्थात, ही मूल्ये अधिक पुरुषवादी मानली जातात. एखाद्या धोरणात कौटुंबिक जबाबदाऱ्या आड येत असल्यास महिलांना ती करिअरमधील शिक्षा वाटते. घरातील वृद्धांची जबाबदारी असल्यास कामाप्रति त्यांची निष्ठा कमी आहे, असे मानले जाते. एका अहवालानुसार, केवळ ३% महिलांना कौटुंबिक जबाबदारी ही करिअरमधील गंभीर अडचण वाटते. याउलट ५०% महिलांना महिला-पुरुष भेदभाव हे मुख्य कारण वाटते. ७% महिला कर्मचारी कौटुंबिक कारणांमुळे नोकरी सोडतात, तर ७३% महिलांना नोकरीत फार वाव मिळत नाही म्हणून नोकरी सोडतात.


विज्ञान क्षेत्राला चांगल्या वैज्ञानिकांची गरज
आहे. महिलांच्या क्षमता जोखून ही उणीव भरून काढता येऊ शकते. विज्ञानातील असंख्य उद्दिष्ट गाठणे तसेच अयोग्य आणि अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी महिलांच्या प्रतिनिधित्वाची गरज आहे. भारताला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व क्षेत्रांना गती देण्याची गरज असून महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील लैंगिक भेदभाव देशातील अार्थिक स्थिती कमकुवत करते. यात बदल झाल्यास महिलांना पुढे येण्याची संधी मिळेल तसेच त्यांच्या क्षमतांचा देशासाठी उपयोग होईल.
डॉ. स्वाती पिरामल
व्हाइस चेअरपर्सन, पिरामल ग्रुप
 

बातम्या आणखी आहेत...