आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांपूर्वी कुटुंब नियाेजनाची शस्त्रक्रिया करूनही महिला गर्भवती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेचा पती शेख रज्जाक - Divya Marathi
महिलेचा पती शेख रज्जाक

बीड - सहा महिन्यांपूर्वी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होऊनही ऊसतोड कामगार महिला गर्भवती असल्याचा प्रकार शनिवारी बीडमध्ये समोर आला आहे. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पत्नी दोन महिन्याची गर्भवती होती. परंतु गर्भपात न करताच तीची बीडच्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असा दावा ऊसतोड कामगार महिला सलिमा शेखचा पती रज्जाक समीद शेख याने केला आहे. 


बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथील ऊसतोड कामगार रज्जाक समीद शेख व त्यांची पत्नी सलिमा हे दोघे ऊसतोडणीचे काम करत आहेत. सलिमा रज्जाक शेख  (२४) ही विवाहिता  बीड जिल्हा रुग्णालयात  कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आली होती. तिला २९ जानेवारी रोजी या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्यांनतर तिला ३१ जानेवारी रोजी सुटी  देण्यात आली. दरम्यान १५ दिवसांपूर्वी विवाहितेचे पोट दिसू लागल्याने त्यांनी खासगी ठिकाणी सोनोग्राफी केली तेव्हा सलिमा ही गर्भवती असल्याचे समोर आले असून येत्या ८ सप्टेंबर २०१९ राेजी तिची प्रसूती होणार असल्याचे समोर आले. दरम्यान, शनिवारी पोटदुखीमुळे रज्जाक याने पत्नी सलिमा हीस  बीड जिल्हा रुग्णालयात सकाळी  आणले होते. 

 

डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, मात्र गर्भपात  झालाच नाही
कुटुंब नियोजन  शस्त्रक्रिया करण्यापूर्वी  माझी पत्नी सलिमा ही दोन महिन्याची गर्भवती होती. गर्भपात व्हावा यासाठी डॉक्टरांनी यापूर्वी गोळ्याही दिल्या होत्या. परंतु गर्भपात  झालाच नाही. दोन महिन्याची ती गर्भवती असतांनाच  जिल्हा रुग्णालयात तिच्यावर कुटुंब नियोजनाची  शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून सध्या ती सात महिन्याची गर्भवती आहे. डॉक्टरांनी ती गर्भवती असताना ही शस्त्रक्रिया केली असून आपण या प्रकरणी तक्रार करणार असल्याचे शेख रज्जाक याने सांगितले आहे. 
 

 

रज्जाक याला ४ मुले 
तालुक्यातील उदंडवडगाव येथील ऊसतोड कामगार रज्जाक शेख हा भूमिहीन असून त्याला एकूण चार अपत्ये आहेत यात तीन मुली व एक मुलगा आहे.या प्रकरणी सोमवारी तो निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देणार आहे.  

 


लेखी तक्रार नाही 
अद्याप माझ्याकडे संबंधीत रुग्णाने कुठलीही लेखी तक्रार दिलेली नाही या प्रकरणी कागदपत्रे पाहून नेमके काय झाले, आहे ते तपासण्यात येईल.
- डॉ .सुखदेव राठोड,
 अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक 

 

डिस्चार्ज कार्डवर उल्लेख 
वाॅर्ड नं : एमटीपी 
कक्षप्रमुख डॉ :  डॉ. राठोड 
नाव : सलिमा रज्जाक शेख 
वय : २४  
नोंदणी क्रमांक  : ३७९३ 
पत्ता: उदंडवडगाव ता. बीड 
दाखल झाल्याचा दिनांक : २९ जानेवारी २०१९ 
रुग्णालयातून सुटीचा दिनांक   : ३१ जाने. २०१९
रोग निदान :   गर्भपात करून शस्त्रक्रिया

 

बातम्या आणखी आहेत...