आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयसिस'मध्ये भरती झालेल्या महिला पीडित नसतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यास्मिन मोहम्मद


गेल्या आठवड्यात सिरियातील न्यूज एजन्सीने एल होल कॅम्पमध्ये आयसिसचे समर्थन करणाऱ्या महिलांचा एक व्हीडीओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये आपादमस्तक काळे कपडे परिधान केलेली, डोळे डबडबलेली एक महिला सांगत होती, की आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीच्या मृत्यूनंतरही आपली लढाई सुरू राहिल. ओसामा बिन लादेन मारला गेला आणि त्याची जागा अल जरकावी ने घेतली. पुढे त्याच्या जागी अल शिषानी आला. आणि आता अल बगदादी. जर तो मारला गेला, तर त्याची जागा त्याच्याहून चांगला नेता घेईल.' या घटनेनंतर चार दिवसांनी आयसिसने अबू इब्राहिम अल हाशिनी अल कुरेशी याला आपला म्होरक्या घोषित केले. आपल्या नेत्यांप्रमाणेच आयसिसचे समर्थकही आपली हार झाल्यावर खोटे दावे करतात. एका व्हिडिओत अनबर प्रांतातील ४७ वर्षीय उम मोहम्मद सांगतो आहे, 'आम्ही पुढच्या विजयाची वाट पाहात आहोत, इंशा अल्लाह..' त्याच्या जिहादी पत्नी म्हणत होत्या की, 'आम्ही बदला घेऊ. आणि त्यावेळी शत्रूच्या गुडघ्यापर्यंत रक्ताचे पाट वाहतील. हे बंड कधी शमणार नाही कारण आम्ही ते नवजात बालके अन् मुलांच्या मनात, मेंदूवर भिनवले आहे.' दुर्दैवाने दहशतीचे समर्थन करणाऱ्या या महिला योग्य आहेत. कुणा जिहादीची हत्या, भले तो कुठल्या इस्लामिक स्टेटचा नेता असो; ती एक वायफळ प्रयत्न असते. अशा म्होरक्यांना मारण्याचा आवेश इस्लामला मानणाऱ्यांचे गैरसमज आणि बंड उभे करण्याच्या विचारांचा परिणाम आहे. आपण एखाद्या दहशतवादी संघटनेच्या नेत्याला संपवले, तर त्याची संघटनाही नेस्तनाबूत होते, हा एक भ्रम आहे. वास्तविक एक शिर कापल्याने आणखी दोन डोकी उभी राहतात. ते पुन्हा एकत्र येतात आणि उभे राहतात. ही इस्लाम इतकीच लांब कहाणी आहे, जी पुढे जात राहते.


इस्लामी दहशतवादी संघटनांची रचना वेगळी आहे. त्यांचा म्होरक्या अस्थायी आणि नावापुरता शासक असतो. एखाद्या पंथाचे अनुयायी ज्याप्रमाणे आपल्या नेत्याचे विचार, मागण्या आणि योजनांना मानतात, त्याप्रमाणे दहशतवादी संघटनांचे म्होरके आपल्या समर्थकांच्या श्रद्धेचा आनंद लुटत नाहीत. उलट त्यांची चाल, विचार, मागणं आणि योजना सुरुवातीपासूनच अल्लाचा हुकूम मानला जातो. नेत्यांमध्ये फेरबदल आणि तख्तपालट होतो, समर्थकही बदलतात. पण, सगळे एकाच प्ले बुकला मानतात. या चर्चेतील आणखी एक भ्रम म्हणजे, आयसिसमध्ये भरती झालेल्या महिला पीडित असतात. जिहादी बायकांच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यापुढे ओरडणाऱ्या, धमक्या देणाऱ्या महिलांना पाहून कुणालाही लक्षात येईल की त्यांना पीडिता मानणे हा गैरसमज आहे. दहशतवादी संघटनेत भरती होणारे पुरुष, महिला सगळे जण आपल्या कृत्याला जबाबदार असतात. आयसिसमध्ये भरती होणाऱ्या महिलांना पुरुषांप्रमाणेच राजी केले जाते. आणि बदल्यात त्या आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढ्यांना दहशतवादी बनण्यासाठी समजावतात, तयार करतात. मी हे खात्रीपूर्वक यासाठी सांगू शकते, की मी अशाच एका परिवारात मोठी झाले आहे. माझे संगोपन एका कट्टरपंथी इस्लामिक परिवारात झाले आणि अल कायदाच्या एका दहशतवाद्याशी माझे बळजबरीने लग्नही लावण्यात आले. माझ्या आईचे शिक्षण इजिप्तच्या अल अजहर विद्यापीठात झाले. तिने कधी मानसिक, तर कधी शारीरिक छळ करुन, मारहाण करुन माझ्या मनात दहशतीबद्दल विश्वास निर्माण करण्याचा अनेक वर्षे प्रयत्न केला. कॅनडात राहूनही माझ्या आईचे विचार आणि समज एखाद्या जिहादी पत्नीसारखेच होते. सिरियामधील बंड, लैंगिक गुलामी आणि समलैंगिकांना उंच इमारतींवरुन खाली फेकण्याची स्वप्ने माझी आई पाहायची, जी भयावह स्वरुपात आयसिसच्या माध्यमातून काही प्रमाणात खरी झाली. मी इस्लामिक कट्टरपंथाला विरोध केला आणि आपल्या परिवारासह लांब पळून आले.


महिलांसाठी आयसिसमध्ये सहभागी होणं केवळ एखाद्या दीर्घ वाक्यानंतरचा पूर्णविराम होण्यासारखं आहे. जर आपण शेवटच्या टोकावर जावून त्यावर प्रहार केला, तर ही घाणेरडी आणि विषारी विचारसरणी संपणे शक्य नाही. खरा बदल घडवायचा असेल, तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अखेरीस नव्हे, तर लोकांना बहकावले, फूस लावले जात असेल त्याचवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचणे. हे साध्य करण्याची योग्य पद्धत म्हणजे, या विचारसरणीच्या विरोधात लढणाऱ्या मुसलमान समुदायाचे समर्थन मिळवणे. इराणमध्ये महिला बुरख्याच्या सक्ती विरोधात लढत आहेत. या महिला म्हणजे असे लढवय्ये आहेत, जे लढाईत सर्वांत पुढं असतात. सत्तेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या अशा महिलांचा अंत एक तर तुरुंगात होतो किंवा त्यांना मारले जाते. सौदी अरेबियात वाहने चालवण्याच्या स्वातंत्र्यासाठी वा लैंगिक भेदभाव करणारे कायदे हटवण्यासाठी लढत होत्या, त्यांना तुुरुंगात टाकण्यात आले.


हिंसक, धार्मिक अत्याचाराच्या अशा कहाण्या अंतहीन आहेत आणि त्या मुसलमानांच्या विश्वात सगळीकडे पाहायला मिळतील. अशा अत्याचारित लोकांना आपल्या पाठबळाची गरज आहे,पण त्याकडे बहुतांश दुर्लक्ष होते. सध्या जगभरात शेकडो दहशतवादी गट आहेत. त्यातून पुढची आयसिस तयार होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. आणखी इतरही मार्ग आहेत, हे त्यांना सांगावे लागेल. या लढाईत सुधारणावादी मुसलमान महत्वाची कामगिरी बजावू शकतात. ते अशा लोकांच्या मन आणि मस्तिष्कामध्ये आत्मज्ञानाचे बीज पेरतील. अशा खुल्या विचारांच्या क्रांतिकारकांसाठी पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे ते धर्माच्या कट्टरवादाविरुद्ध काम करु शकतील आणि शांती प्रस्थापित होईल.


यास्मिन मोहम्मद (संस्थापिका, 'फ्री हार्ट्स-फ्री माइंड') इस्लामिक देशांतील महिलांसाठी काम करीत आहेत.