जालना / विक्रेत्यांनाे, गावात दारू विक्री कराल तर गाढवावरून काढू ‘धिंड’; महिलांनी वेशीवरच झळकवले बॅनर

वारकरी संप्रदाय ही गावची ओळख पुसत असल्याने कल्याणी गावातील महिलांनी फेरी काढून ग्रामपंचायतीत घेतला ठराव

प्रतिनिधी

Jul 11,2019 09:04:00 AM IST

जालना / पिंपळगाव रेणुकाई - गावात एकही परवाना नाही, तरीही गावात गावठीसह देशी दारू विक्री व्हायची. यामुळे अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले होते. यामुळे गावात तंटे वाढले होते. यामुळे वारकरी संप्रदाय म्हणून ओळख असलेल्या गावाची ओळख पुसत असल्यामुळे महिलांनी अनेकदा पोलिस प्रशासनाला निवेदने दिली. परंतु पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे आता महिलांनी पुढाकार घेऊन गावात दवंडी देत प्रभातफेरी काढत जो गावात दारु विक्री करील त्याची महिला गाढवावरुन धिंड काढणार असल्याच्या घोषणा देत त्या विक्रेत्यांची झोप उडविली आहे. महिलांच्या या पाठिंब्याला ग्रामपंचायतनेही पाठबळ देऊन ठराव संमत केला. गावाच्या प्रवेशव्दारात बॅनर लावून इतर गावातील महिलांच्या पुढकारासाठी चांगला संदेशच दिला आहे. भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावातील या ‘रणरागिणीं’ची पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनीही विशेष नोंद घेतली.


अवैध दारु विक्रीमुळे अनेक संसार उघड्यावर येतात. यामुळे गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त पुढाकार राहतो. दरम्यान, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरासह जिल्ह्यात विशेष मोहिमा राबवून अनधिकृ़त असलेले हातभट्ट्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील महिलांनी बुधवारी सकाळी गावात दारु विक्रेत्याच्या विरोधात प्रभातफेरी काढून जो कुणी यापुढे गावात अवैध दारु विक्री करेल त्याची गाढवावरुन धिंड काढण्यात येईल, असा ग्रामसभेत ठराव घेतला. या गावात यापूर्वीही दारु बंदी करण्यात आली होती. परंतु त्याला यश आले नाही. गावातील दीडशे ते दोनशे महिलांनी दारु विक्रेत्याला चांगलाच धडा शिकविण्यासाठी बुधवारी गावात प्रभातफेरी काढून जो कुणी यापुढे गावात अवैध दारु विक्री करेल, त्याची गय केली जाणार नाही, असे बॅनरच लावले. या मोर्चात महिला आपल्या लहान मुलांना घेऊन सहभागी झाल्या होत्या. गावातून दारु विक्रेत्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतरही दारु विक्री न थांबल्यास या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेणार असल्याचे सांगण्यात आले. दारु बंद करण्यासाठी प्रतिभा देवतवाल, संध्या इंगळे, शिला जोगदंडे, कमला लाड, शशिकला लाड, रेखा लाड, सुरया शेख आदी महिलांनी पुढाकार घेतला आहे.

अभिनंदनीय बाब
गावपातळीवरील महिलांनी घेतलेला पुढाकार. तेथील ग्रामस्थांनी घेतलेला ठराव हा अभिनंदनीय आहे. अशाच प्रकारे इतर गावांनीही संघटित होऊन या गावचा आदर्श घ्यावा. दारू विक्री होत असल्यास पोलिस ठाण्यांना माहिती द्या. जेणेकरुन कारवाई करण्यास सोयीस्कर होईल.
एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.

X
COMMENT