आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रखमा आमच्याकडे घरकाम करणारी बाई. चांगल्या सुशिक्षित वस्तीत काम करत असल्याने तिने मुलांवर चांगले संस्कार केले. मुलेही गुणी आणि हुशार निघाली, पण नवरा दारुडा होता. व्यसनामुळे त्याला गंभीर आजार जडला. एकदा तर तो रस्त्यातच चक्कर येऊन पडला. लोकांच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी नव-याच्या आजाराची कल्पना दिली. औषधोपचारांच्या खर्चाचा भार तिच्यावरच पडला.

आधीच संसाराचे ओझे वाहताना ती पिचून गेलेली; तशात नव-याच्या दवाखान्याचा खर्च मागे लागल्याने तिला आता अर्धपोटी काम करण्याची वेळ आली. मरमर करत असल्याने तिचीही प्रकृती अशक्त बनली होती. मुलांसाठी खस्ता खात होती. महागड्या औषधांमुळे तो बरा झाला. पण पुन्हा तेच... दारूसाठी पैसे मागू लागला, दिले नाही तर मारझोड करू लागला. एकदा तर तिला बेदम मारले. बिचारी रखमा, नव-याने मारले अन् पावसाने झोडले तर सांगणार कुणाला, असे म्हणत कामाला जुंपून घेत होती. अशा अनेक अत्याचारांच्या घटना आपण रोज पाहतो. संसारासाठी स्त्रियांनीच खस्ता खाव्यात का? संसार दोघांचाही असतो. रखमाचे हाल मला पाहवले नाहीत. मी तिला सोबत घेऊन जवळच्या पोलिस ठाण्यात गेले. तिच्या नव-याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला कायद्याचा हिसका दाखवला. पुन्हा मारझोड करशील तर याद राख, अशी दटावणी केल्याने त्याने आपले वर्तन सुधारले. मला याचा आनंद वाटला, आता रखमाचे आयुष्य सुधारेल. स्त्री जन्माची शोकांतिका महिलांनीच आता सामर्थ्य दाखवून संपवली पाहिजे. नाहीतर महिला दिन कोणत्या अर्थाने आपण साजरा करतो, याचे कोडे मला अजूनही उलगडलेले नाही!