आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरा वतन... : चला, देशरक्षणाला सिद्ध होऊ !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देश तुमच्यासाठी खूप काही करतो. तुम्ही देशासाठी काय करता, हे जास्त महत्त्वाचं.

मेजर सय्यदा फिरासत  

देश तुमच्यासाठी खूप काही करतो. तुम्ही देशासाठी काय करता, हे जास्त महत्त्वाचं. आज विविध क्षेत्रात महिलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्यातील गुणवत्ता ओळखा. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच देशाचं रक्षण करण्याची, त्याचं भवितव्य घडवण्याची ताकद प्रत्येकीच्या मनात अन् मनगटात आहे. गरज आहे, ती केवळ इच्छाशक्तीची अन् निर्धाराची..!  


कर्तव्य, शासन आणि शिस्त. या जोडीला मेहनत आणि एक असं काम ज्यात तुमचा आनंद आहे. तो आनंद मला भारतीय लष्करातील करिअर निवडल्यामुळे मिळाला. माझं शालेय शिक्षण होली क्रॉस शाळेत झालं. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. या पदवी शिक्षणाबरोबरच ‘यूपीएएससी’चीही तयारी सुरू होती. २००७ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी मी लेफ्टनंट पदाची परीक्षा पास झाले. घरात शिक्षणाच वातावरण होतं. सर्वच जण उच्च शिक्षित. आई महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाची प्रमुख होती, तर वडील वकील. आजोबांना मी कधी पाहिलं नाही, पण ते दोन्ही युद्धाच्या वेळी आर्मीत होते. इंजिनिअरिंग झाल्यावर अनेक संधीही होत्या. पण, मी आर्मीतच जायचं ठरवलं होतं. आजही आठवतं, मला वडील सूर्य उगवण्यापूर्वी सांस्कृतिक मंडळावर जॉगिंगसाठी घेवून जात. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. 

आर्मीतील ट्रेनिंग खूप कठीण असतं. माझे केस खूप लांब होते. ट्रेेनिंगच्या वेळी पहिल्यांदा ते कापण्यात आले, तेंव्हा खूप वाईट वाटलं. आईनं मला समजावलं. कामात आर्मीमुळे शिस्त आली. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचाही त्यात फायदा झाला. माझी पहिली पोस्टिंग बिकानेर येथे झाली, त्यावेळी आठशे पुरुषांमध्ये मी एकटी महिला होते. पण, कामात कोणत्याही वेळी मी कमकुवत आहे, असे जाणवले नाही. तिथे प्रत्येक वेळी गुणवत्तेमुळे मला संधी मिळत गेली. २०१६ मध्ये मी निवृत्त झाले. भटिंडा, इंदूर, चंदिगढ, चेन्नई या ठिकाणी काम केले. उत्तम कामगिरीमुळे मला गौरविण्यातही आले. सध्या मी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम पाहते आहे. मला नेहमी असं वाटतं, देश तुमच्यासाठी खूप काही करतो. तुम्ही देशासाठी काय करता, हे जास्त महत्त्वाचं. आज विविध क्षेत्रात महिलांना संधी मिळते आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे तुमच्यातील गुणवत्ता ओळखा. हे बदल तुमच्यात शिक्षणामुळेच येतील. ‘जिंदगी में कई मौके आते हैं, पर एक मौका जिंदगी बदल देता हैं...’ यावर माझा ठाम विश्वास आहे. मैत्रिणींनो, स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच देशाचं रक्षण करण्याची, त्याचं भवितव्य घडवण्याची ताकद तुम्हा प्रत्येकीच्या मन अन् मनगटात आहे. गरज आहे, ती केवळ आपल्या इच्छाशक्तीची अन् निर्धाराची..! 

आधी भीतीवर विजय मिळवा 
आर्मीत ट्रेनिंगच्या वेळी दहा किलोमीटर स्विमिंग करायचे होते. त्यावेळी खूप घाबरले होते. पण, जेव्हा तो टास्क पूर्ण केला, त्या दिवसापासून पुन्हा कधी पाण्याची भीती वाटली नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कशाची न कशाची भीती मागे खेचत असते. तिच्यावर मात केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य नाही.

(लेखिका जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहेत.) 
शब्दांकन : विद्या गावंडे, औरंगाबाद. 
 

बातम्या आणखी आहेत...