आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कुटुंबासाठी लढतात म्हणून त्यांच्या आत्महत्या कमी; प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे प्रतिपादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब - दुष्काळाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, महिला शेतकरी यांच्या आत्महत्येची संख्या कमी आहे. कारण, त्या कुटुंबासाठी लढत असतात. त्यामुळे या महिलांना पाठबळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तथा “चला हवा येऊ द्या’ तील पत्राचे लेखक अरविंद जगताप यांनी केले.


कळंब रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ व कळंब भूषण पुरस्कार वितरण सोहळा शहरातील महावीर भवन येथे संपन्न झाला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप बोलत होते. यावेळी मावळते अध्यक्ष व सचिव यांनी नुतन अध्यक्ष हर्षद अंबुरे व सचिव प्रा. हनुमान चौधरी यांच्याकडे तर इनरव्हीलच्या मावळत्या अध्यक्षा व सचिव यांनी नुतन अध्यक्षा राजश्री देशमुख व सचिव निता देवडा यांच्याकडे आपला पदभार सोपवला.   जगताप म्हणाले की, कोणी हसून तर कोणी रडुन डोळ्यांत पाणी आणते. परंतु, कोणी धरणात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत नाही.   मराठवाडा ज्याला मागास वाटतो तोच माणूस मागासलेला असून संताच्या स्पर्शाने मराठवाडा हा वैचारिक दृष्ट्या सुपीक प्रदेश झालेला आहे. शहरात पिक्चरला जाणे, मॉलमध्ये खरेदी करणे हा जगण्याचा भाग झाला आहे. मात्र, ग्रामीण भागात शेतातील पिके, गारपीट, दुष्काळ व पिकांना भाव मिळवण्यासाठीची धडपड हा जगण्याचा भाग आहे. शहरी संस्कृतीमधील मनोरंजन महत्त्वाचे नसून ग्रामीण भागातील जगण्याचा संघर्ष मोठा आहे.


महिला वडाची पूजा करतात, तर काही ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून पूजा केली जाते. आता ही पध्दत बदलण्याची गरज आहे. महिला वडाची पूजा करतात. त्याच दिवशी झाडे लावण्याची गरज आहे.   सध्या महापुरुषांच्या जयंती करणे व कोणाला भेटायचे असेल तर महापुरुषांच्या पुतळ्याच्या चौकाचा पत्ता सांगणे ऐवढ्यापर्यंतच महापुरुषांना मर्यादित करण्यात आले असून महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन जगण्याची गरज आहे असेही जगताप म्हणाले. 

 

भातलवंडे यांचा कळंब भूषण पुरस्काराने सन्मान
रोटरी क्लब ऑफ कळंबच्या वतीने कळंब भूषण पुरस्कार या वर्षी पासून देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या वर्षीचा पुरस्कार योगगुरू शशिकुमार भातलवंडे यांना देण्यात आला आहे. यावेळी सन्मानचिन्ह व ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
 

 

प्रत्यक्ष संवादातून नाती जिवंत ठेवण्याची गरज
सध्या सोशल मीडियामुळे संवाद कमी होत असून अनेक नाती दुरावत  आहेत.  ग्रामीण भागात गावपणही लुप्त होत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा संवाद मर्यादित करून प्रत्यक्ष संवाद वाढवून नाते जिवंत ठेवण्याची गरजही अरविंद जगताप यांनी व्यक्त केली.