आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धेतील दुजाभाव माेडीत (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयाने सलग दुसऱ्या दिवशी महिलांचे अधिकार अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वयाेगटातील महिलांना शबरीमला मंदिरातील प्रवेशाचा मार्ग शुक्रवारी खुला करत असताना सामाजिक परिवर्तन रुजवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नव्हे, तर या निमित्ताने धर्माशी निगडित अावश्यक मुद्द्यांच्या संदर्भात न्यायालयाने व्याख्या करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला अाहे. 


केरळच्या शबरीमालामधील शैव अाणि वैष्णवांचा समन्वय अतिशय अद््भुत असाच अाहे. तथापि, येथे १० ते ५० वर्षे वयाेगटातील महिला वगळता काेणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला मंदिर प्रवेशास मज्जाव नव्हता. अयप्पन हे ब्रह्मचारी असल्याने तसेच मासिक पाळीच्या कारणावरून महिलांना येथे मंदिर प्रवेशास मनाई हाेती. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने ८०० वर्षांपासून चालत अालेली प्रथा अाज माेडीत काढली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाने चार विरुद्ध १ अशा बहुमताने हा निर्णय दिला. त्याचसाेबत धार्मिक स्वातंत्र्य अाणि धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाच्या स्वातंत्र्याशी निगडित अनुच्छेद २६ अंतर्गतच्या अनुच्छेद १४ चे उल्लंघन करता येत नाही, असे सुचवत वय किंवा शारीरिक अवस्थेच्या कारणावरून महिलांना प्रवेश नाकारता येत नाही, हे स्पष्ट केले. एकंदरीत अाता मंदिर प्रवेशाच्या या निर्णयाने महिला अधिकारांच्या बाबतीत देशभर उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळेल, अशी अाशा करूया. वस्तुत: देशात खासगी मंदिराचे काेणतेही धोरण नाही. मंदिर ही काही खासगी संपत्ती ठरत नाही, असे असतानाही शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर केरळ सरकारने तीन वेळा भूमिका बदलली. २०१५ मध्ये महिला प्रवेशबंदीचे समर्थन केले. त्यानंतर शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्यास आमचा पाठिंबा असल्याचे केरळ सरकारने ७ नोव्हेंबर २०१६ रोजी कोर्टात स्पष्ट केले. तत्कालीन एलडीएफ सरकारने महिलांची बाजू उचलून धरली. मात्र, काँग्रेसचे सरकार येताच निर्णय बदलला. २०१७ मध्ये त्यास विराेध झाला अाणि यावर्षी महिलांच्या मंदिर प्रवेशाचा अाग्रह सुरू झाला. तात्पर्य केरळ सरकारदेखील महिलांविषयी कसा दुजाभाव बाळगत हाेते हे लपून राहिलेले नाही. एकूणच या पार्श्वभूमीवर त्रावणकाेर देवासम बाेर्ड अाणि देशभरातील अन्य मंदिरे जी अद्यापही महिलांना समानतेचा हक्क देण्यास धजावत नाहीत, ते अापले नियम कसे बदलतात ते पाहावयाचे. 


वस्तुत: मंदिर हे श्रद्धा अाणि भक्तीचे प्रतीक अाहे. त्या ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेदभाव करणे, भक्तीला लिंगभेदाच्या चाैकटीत अडकवून ठेवणे जसे याेग्य ठरत नाही तसेच देहाच्या नियमांनी देवाचे नियम ठरवले जाऊ शकत नाहीत. एकीकडे काेणत्या ना काेणत्या रूपात स्त्रीशक्तीची पूजा करणारे लाेक जेव्हा त्यांच्यावरच दर्शन, पूजा, प्रार्थनेस बंदी घालतात तेव्हा ताे त्यांचा अवमानच ठरत नाही का? मंदिरात किंवा पूजाअर्चेच्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही प्रवेश मिळाला पाहिजे. पुरुष देवतेसमोर जाऊन प्रार्थना करत असतील तर महिलांना बंदी का असावी? सामाजिक समानता ही केवळ कागदाेपत्री, राज्य घटनेत नकाे तर प्रत्यक्षात अनुभवास येणे तितकेच गरजेचे अाहे. मंदिराचे पावित्र्य राखण्याचे भान महिलांना उपजत असते, तरीही समाजातील प्रतिगामीपण संपल्याचे दिसत नाही. वस्तुत: श्रद्धेच्या नावावर लिंगभेद केला जाऊ शकत नाही. धर्माचरणाचा अधिकार प्रत्येकालाच अाहे, तसा ताे महिलांनादेखील अाहे अाणि ताे माैलिक अाहे. शबरीमलामधील परंपरा धर्माचं अभिन्न अंग कसे काय ठरू शकते, अाणि भारतीय संविधान तरी महिलांचा असा अवमान सहन करील का? महिलांच्या बाबतीत दुजाभाव करणे, त्यांच्या अात्मसन्मानाला तडा देणे हे घटनाविराेधी ठरते. त्यामुळेच राज्यघटनेतील समानतेच्या अधिकाराकडे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासाेबत जाेडून पाहण्याची खरी गरज हाेती. नेमके हेच सर्वाेच्च न्यायालयाने केले. कारण समाजात हाेणारा बदल दिसणे हे देखील तितकेच गरजेचे अाहे, अाणि या निकालाने ते साध्य व्हावे. 


वस्तुत: मंदिर हे सार्वजनिक ठिकाण अाहे. जर पुरुष त्या ठिकाणी जाऊ शकत असतील तर ताे अधिकार महिलांनादेखील का नसावा? महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर असाे की त्र्यंबकेश्वर, हाजी अली असाे की काेल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर या ठिकाणी प्रवेशासाठी महिलांना झगडावे लागले. परंतु ज्या मंदिर प्रवेशाच्या हक्कासाठी महिला झगडल्या, न्यायालयाने त्यांना ताे हक्कदेखील दिला तरीही परंपरेच्या दबावाखाली महिलांनीच स्वत:हून ताे नाकारल्याचे पाहायला मिळते, ही वस्तुस्थिती अाहे. याचा अर्थच असा की, महिलांच्या अधिकारांविषयी न्याय व्यवस्था सकारात्मक असली तरी महिला वर्गाची इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची ठरते. ती जाेरकस असेल तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकेल, तसे पाहायला मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...