आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातरागिणींचे आज अंधारावर आक्रमण; नऊ वाजेपासून नारीशक्तीचा नाइट वॉक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : असुरक्षिततेची बंधने झुगारून 'मौन सोडू, चला बोलू' या निर्धाराने शहरातील हजाराे महिला अंधारावर चालून जाणार आहेत. 'दिव्य मराठी'तर्फे रविवार, दि. २२ डिसेंबरला अर्थात वर्षभरातील सगळ्यात माेठ्या रात्री हा महिला नाइट वाॅक निघणार आहे. रात्री ९ वाजता, गंगापूरराेडवरील मॅरेथाॅन चाैक, रावसाहेब थाेरात सभागृह, गंगापूरराेड येथून हा वाॅक सुरू हाेणार आहे. शहरातील अधिकाधिक महिलांना सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्भापासून घरापर्यंत आणि कार्यालयापासून रस्त्यापर्यंत महिला असुरक्षित असताना तितकीच बंधनेही तिच्यावर घातली जातात. 'रात्र ही तिची वैरी' असल्याचे सांगून मर्यादा घातल्या जातात. हीच बंधने झुगारण्यासाठी 'दिव्य मराठी'ने 'मौन सोडू, चला बोलू' हे अभियान सुरू केले आहे. 

हा नाइट वाॅक म्हणजे कोणाविरुद्ध आंदोलन नसून जगण्याचा निखळ जल्लोष आहे. महिलांनी वाॅकसाठी येताना आपल्या संस्थेचा, संघटनेचा, मंडळ वा ग्रुपचा ड्रेसकोड ठरवून यावे. यासाठी कोणत्याही रंगाचे तसेच पेहरावाचे बंधन नाही. महिला संस्थांनी आपले बॅनर घेऊन सहभागी व्हावे.

या वाॅकदरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांतून महिला सुरक्षेचा संदेश देणारे जल्लाेषात्मक कार्यक्रम अनेक संस्था सादर करणार आहेत. त्यात महिला बाइकर्स, सायकलिस्ट तर आहेतच त्याचबराेबर भजन, कथक नृत्य, मंगळागाैरीचे खेळ, पथनाट्य, ढाेलपथक, महिलांची तलवारबाजी, महिलांची झिम्मा-फुगडी असे कार्यक्रम सादर करण्यात येणार अाहेत.

शहरातील शिक्षण संस्था, गृहिणींच्या संस्थांसह अनेक महिला व महिला संघटनांच्या प्रतिनिधी या वाॅकमध्ये सहभागी होणार आहेत. मॅरेथाॅन चाैकात आल्यावर महिलांनी सोबत प्रसिद्ध झालेल्या प्रवेशिका भरून जमा करायच्या आहेत. याचबरोबर, सहभागासाठी प्रत्यक्ष वेळेवर आलेल्या महिला संस्था आणि संघटनांसाठी वाॅकच्या सुरुवातीला प्रवेशिका भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी कार्यक्रमस्थळी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या संस्था, संघटनांचा मदतीचा हात : महिलांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या या उपक्रमास शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांसह अनेक व्यावसायिकांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात दिला आहे. त्यात मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक पोलिस, निर्भया पथक, वाहतूक पोलिस, अनमोल नयनतारा, ब्रिजमोहन टूर्स, अर्थ मूव्हर्स असोसिएशन, तुषार मिसळ मित्रमंडळ, तेज आर्ट क्रिएशन, सहस्त्रनाद वाद्य पथक, वूमन वॉकेथॉन यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात दिला आहे.

महिलांच्या हस्ते मशाल पेटवून रॅलीस प्रारंभ

मविप्र मॅरेथॉन चौकात रात्री ९ वाजता नाइट वाॅकची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, होमगार्ड अधीक्षक माधुरी कांगणे, डाॅ. रत्ना रावखंडे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सुनीता पाटील (अमरधाम सेवक), डॉ. कृष्णा पवार (वैद्यकीय अधिकारी), सीमा काळे (परिचारिका प्रमुख) व अपूर्वा जाखडी (नासा प्रशिक्षक) या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून रातरागिणी नाइट वाॅकला प्रारंभ होईल.

ही एका बदलाची सुरुवात

हा फक्त एक नाइट वाॅक नसून ही एका परिवर्तनाची सुरुवात आहे. समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतःच घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न ठेवता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. म्हणूनच आपण सामील होऊ या 'दिव्य मराठी'च्या या रातरागिणी नाइट वॉकमध्ये. - श्रीया स्वप्नील तोरणे, मिस टिन युनिव्हर्स इंडिया, मिस टीजीपीसी इंडिया इलाइट)

वाॅकमुळे मनोधैर्य वाढेल

महिला सुरक्षिततेचा मुद्दा देशभर गाजत आहे. विकृत पुरुषी वृत्तीचा बळी ठरत असलेल्या तरुणी अथवा महिला यांचे मनोधैर्य वाढवणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. हीच भावना जागवण्यासाठी, महिलांना धीरोदात्तपणे उभे करण्यासाठी टूगेदर व्ही हा समाजमाध्यमातील ग्रुप कार्यरत करणार असून त्यात महिलांना सहभागी करून घेतले जाईल. - अस्मिता देशमाने

नाइट वाॅकसाठी आज वाहतूक मार्गात बदल

'दिव्य मराठी'तर्फे आयाेजित रातरागिणी नाइट वाॅकसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकापासून रविवारी (दि. २२) रात्री ९ वाजता हा नाइट वाॅक सुरू होणार आहे. गंगापूरनाका सिग्नल येथून डाव्या बाजूने अहिरराव फोटो स्टुडिओकडून बिगबाजार, सिग्नलच्या उजव्या बाजूला वळून विद्याविकास सर्कल, जुना गंगापूरनाका, उजव्या बाजूने वळून गंगापूररोडने पुन्हा मॅरेथॉन चौकात वाॅकचा समारोप होणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाॅक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावर रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येईल. या मार्गावरील वाहतूक गंगापूररोड, काॅलेजरोडवरील दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूच्या मार्गांचा सर्वप्रकारच्या वाहनांना जाण्या-येण्यास वापर करता येईल. वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अावाहन वाहतूक विभागाने केले आहे.

महिलांनी येताना ही काळजी घ्यावी
 
- मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, चेन यांची विशेष काळजी घ्यावी.
- चालताना त्रास होईल अशा चप्पल, सँडल घालू नये. स्पोर्ट‌्स शूज घालता येतील.
- वॉकसाठी कोणत्याही ड्रेसकोडचे बंधन नाही. तुमच्या ग्रुपच्या ओळखीसाठी ड्रेसकोड केल्यास चालेल.
- संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकाचा वापर अडचणीच्या वेळी करावा. (संपर्कासाठी दिव्य मराठी प्रतिनिधी सई कावळे (९३४००६१७८४) यांच्याशी संपर्क साधावा.)

असा निघेल रातरागिणी नाइट वाॅक

मॅरेथॉन चौक (गंगापूररोड) - जुना गंगापूरनाका - अहिरराव फाेटाे लॅब काॅर्नरमार्गे कॉलेजरोड - बिग बाजार (कॉलेजरोड) - हॉट चिप्स चौकातून गंगापूररोडकडे - निर्माण हाउसमार्गे विद्याविकास सर्कल (गंगापूररोड) - मॅरेथॉन चौकात समारोप.