आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा निषेध म्हणून बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढत पालिकेच्या आवारात रिकाम्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हा हंडा मोर्चा थांबवला. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत, तर अनेक भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बोपोडीतील महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.
बोपोडी प्रभाग क्रमांक आठमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेकांच्या नळांना पाणी येत नाही. आले तरी अतिशय कमी दाबाने येते. सणासुदीच्या काळातही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी, तसेच हक्काचे पाणी लवकर मिळावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास 100 महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा नेला. तिथे महात्मा फुले पुतळ्याजवळ घेर करत रिकाम्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.
आयुक्त सौरभ राव यांनी याची दखल घेत सुनीता वाडेकर व शिष्टमंडळाला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. एक दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एसएनडीटी व चतुःशृंगी जलकेंद्रातून पाणी देण्याचा, तसेच दोन पंपिंग करण्याच्या सूचना त्यानी दिल्या. एक-दोन दिवसात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर महिलांनी आपले हंडा दांडिया आंदोलन थांबवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.