आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची सुरक्षा महत्त्वाची; तक्रारींकडे कानाडाेळा नकाे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असला तरी त्यांनी समाजातील शेवटचा घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे. तंत्रज्ञानातील नवनवीन बदल स्वीकारून पोलिस दलाने देशांतर्गत घडामोडी तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत,' असे अावाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरातील पाेलिसांना केले. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. महिलांच्या तक्रारींकडे कानाडोळा करता कामा नये,' अशा सूचनाही माेदींनी केल्या.

'देशांतर्गत सुरक्षा' या विषयावर अायाेजित देशातील पाेलिस महासंचालकांच्या परिषदेच्या समाराेपप्रसंगी ते बाेलत हाेते. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय उपस्थित होते. देशातील १८० पोलिस महासंचालक या परिषदेत सहभागी झाले होते.

देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची मोदी यांनी प्रशंसा केली. पोलिसांचे कामाचे स्वरूप तसेच कामाच्या वेळा निश्चित नसतात. अशा परिस्थितीत पोलिसांवर ताण वाढतो. तरीही पोलिसांनी तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत याची जाणीव ठेवावी, असे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत, असे माेदी म्हणाले.

रुग्णालयात जाऊन घेतली अरुण शाैरींची भेट

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरुण शाैरी सध्या रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत अाहेत. माेदींनी तिथे जाऊन शौरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच जुन्या आठवणींना उजाळाही दिला. काही दिवसांपूर्वी घरात चक्कर आल्याने शौरी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

पाेलिसांच्या त्यागाची जाणीव अाहे का; केंद्रीय मंत्र्यांचा प्रश्न

पुणे : पाेलिसांची जनमाणसातील प्रतिमा सुधारणे आणि पोलिस दलांचे सक्षमीकरण यावर भर दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 'अनेकदा प्रसारमाध्यमे, चित्रपट, मालिकांतून पोलिसांचे विपरीत चित्रण हाेते. पोलिसांमधील एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण यंत्रणेलाच दोषी ठरवले जाते. हे योग्य नाही. प्रत्यक्षात वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३०० दिवसांहून अधिक काळ पोलिस ड्यूटीवर असतात. कुटुंबीय, नातेवाईक, कौटुंबिक समारंभ यांना ते उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांच्या या त्यागाची सामान्य नागरिकांना जाणीव असते का?' असा प्रश्न रेड्डी यांनी केला. अनेकदा कर्तव्य करताना पोलिसांना प्राण गमवावे लागतात. त्यांच्या या बलिदानाची आठवण असावी, म्हणूनच दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारल्याचेही रेड्डी म्हणाले.