Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Women's World Ranking Tennis Tournament

महिलांची जागतिक मानांकन टेनिस स्पर्धा : ऋतुजा उपांत्यपूर्व फेरीत; अंकिता रैनाचे पॅकअप

क्रीडा प्रतिनिधी | Update - Dec 06, 2018, 09:57 AM IST

दुसऱ्या मानांकित अंकिताचा पराभव

 • Women's World Ranking Tennis Tournament

  सोलापूर - यजमान भारतासाठी ओअॅसिस पुरस्कृत २५ हजार अमेरिकन डॉलरच्या जागतिक मानांकन टेनिस स्पर्धेत बुधवारचा दिवस 'कहीं खुशी कहीं गम'असा ठरला. एकीकडे प्रतिभावंत बिगरमानांकित ऋतुजा भोसलेने (मूळची करमाळा) महिला एकेरीच्या अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

  कुमठा नाका येथील ज़िल्हा क्रीडा संकुलात बुधवारी झालेल्या सामन्यात ऋतुजाने जपानच्या बिगर मानांकित मियाबी इनोईचा पराभव केला. तीन तास चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ०-४ अशी पिछाडीवर असतानादेखील ऋतुजाने शानदार खेळी करीत ४-४अशी बरोबरी करून सामन्यात चुरस आणली. मात्र, ती स्वतःची सर्व्हिसही राखू शकली नाही. त्यामुळे तिला पहिला सेट ४-६ असा गमवावा लागला. दुसऱ्या सेटमधील अटीतटीच्या सामन्यात ऋतुजाने सर्व्हिस, व्हॉली, फोरहँड, बॅकहँड, ओव्हरहेड व ड्रॉपवर गुण वसूल करीत हा सेट टायब्रेकमध्ये ७-६ (४) असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये संयम, चिकाटीच्या जोरावर ऋतुजाने ६-१ ने तिसरा सेट जिंकला.

  एकेरीच्या सामन्यात रशियाच्या मरिना मेलनिकोवाने भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाचा ६-३, ३-६, ६-१ असा पराभव करून स्पर्धेत उलटफेर केला. अंकिता पहिल्या सेटमध्ये ०-२ने पिछाडीवर होती. परत तिने कमबॅक करत २-२ अशी बरोबरी करीत सामन्यात चुरस आणली हाेती.

  बुधवारचे काही निकाल : एकेरी :
  कातरजयना पीटर (पोलंड) वि. वि. चिह्न यू ह्सू (तैपेई) ६-४,६-३. जिआ जिंग लू (चीन) (४) वि. वि. रिया भाटिया (भारत ) ६-१,६-१. काई लिन झांग (चीन) (७) वि. वि. रेका लुका जानी (हंगेरी) ६-० ६-३. डेनिझ खझानिउक (इस्रायल) (६) वि. वि. मारचिनकेविचा डायना (लॅटव्हिया) ७-५ ३-६ ६-४. तमारा झिदानसेक (स्लोव्हाकिया) (१) वि. वि. बोलकवाडझे मारियम (जॉर्जिया) ७-६(२) ६-२ लेमोईने क्युरिने (हाॅलंड) (५) वि. वि. गोंकॅलवेस पॉला क्रिस्टिना (ब्राझील )६-४ ६-४.
  दुहेरी : ग्रे सारह बेथ (इंग्लंड) आणि यशिका एकेटरिना (रशिया) (१) वि. वि. सिल्वहा इडेन (इंग्लंड) आणि वोगेलसंग एरिका (हाॅलंड) ६-३,३-६,१०-६.

Trending