political / काम असमाधानकारक, म्हणून ६ मंत्र्यांना दिला डच्चू - मुख्यमंत्री

मेहतांच्या चौकशीचा एटीआर सभागृहात मांडू : मुख्यमंत्री
 

विशेष प्रतिनिधी

Jun 17,2019 09:25:00 AM IST

मुंबई - सहा मंत्र्यांचे काम समाधानकारक नव्हते, म्हणून त्यांना वगळले आहे. मंत्री झालेले १३ नवे चेहरे अधिक चांगला परफाॅर्म करतील, अशी आशा आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या लोकायुक्तांकडून झालेल्या चौकशीचा एटीआर (कार्यपालन अहवाल) चालू अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल, असे मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी सह्याद्री अतिथिगृहावर चहापान ठेवले हाेते. त्यावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री बोलत होते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला सत्ताधारी पक्ष आत्मविश्वासाने व उत्साहाने सामोरा जाईल, असेही ते म्हणाले. या अधिवेशनात १३ नवी विधेयके आणि १५ जुनी अशी २८ विधेयके मांडली जातील. या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या सर्व मागण्यांना मूर्त स्वरूप दिलेले आहे.

‘सन्मान’चे पैसे खरिपाला मिळणार : फडणवीस
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीपूर्वी देण्याचे राज्य सरकारने नियोजन केले आहे. त्यासंदर्भातली १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यात आली असून ती लवकरच केंद्राला दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरसकट सर्व शेतकऱ्यांना २ हजारांच्या ३ समान हप्त्यांत वार्षिक ६ हजार रुपये मिळण्याची केंद्राची ‘शेतकरी सन्मान निधी’ योजना आहे. यंदाच्या वर्षाचे तिन्ही हप्ते एकत्रित देण्याचे नियोजन आहे, ते पैसे खरिपाच्या पेरणीपूर्वी मिळतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडे दुष्काळावर बोलण्यास मुद्दाच नाही
दुष्काळाला तोंड देण्यास राज्य प्रशासनाने सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. दुष्काळी उपाययोजनांचे ४ हजार ७०० कोटी रुपये आणि पीक विम्याचे ३ हजार २०० कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे विरोधकांना दुष्काळावर बोलण्यास काहीही जागा उरलेली नाही, असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी या वेळी केला. विरोधकांनी आजच्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात एकही नवा मुद्दा मांडलेला नाही, असा दावा त्यांनी केला. विरोधक जो प्रश्न उपस्थित करतील, त्या प्रत्येकाचे उत्तर आमच्याकडे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांनाच त्यांचे नेते सांभाळता येत नाहीत : मुख्यमंत्री
आपण विरोधकांत फोडाफोडी करत नाही. उलट विरोधकांना त्यांचे नेते सांभाळता येत नाहीत. त्यांची सामान्यांशी नाळ तुटली. त्यामुळे लाजिरवाणा पराभव झाला. मोहिते पाटील घराण्यातील कोणाचीच विस्तारात वर्णी लागली नाही. कारण रणजितसिंह व विजयदादा यांना कुठं, कसं सामावून घ्यायचं हे आमचं ठरलेलं आहे, म्हणून त्यांचा समावेश नव्हता, असे मुख्यमंत्री म्हणाले.

X
COMMENT