आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूतस्करांच्या अटकेसाठी तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड शहर- खैरी नदीपात्रातून वाळू उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे वाळूतस्करांनी तलाठी व तहसीलदारांवर सशस्त्र हल्ला केला. या आरोपींना अटक होईपर्यंत तलाठी संघटना व नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आजपासून सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी एकूण नऊ वाळूतस्करांवर गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार आहेत. 


कामगार तलाठी शिवाजी सखाराम हजारे (सोनेगाव, धनेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धनेगाव शिवारातील खैरी नदीपात्रात शनिवारी रात्री बाराच्या सुमारास वाळूतस्कर अवैध वाळूचा उपसा करताना आढळले. कामगार तलाठी हजारे, विकास मोराळे, प्रशांत कांबळे यांनी त्यांना प्रतिबंध केला असता वाळूतस्कर महेश शिंदे (चिंचपूर, ता. परांडा, जिल्हा उस्मानाबाद), अमित देशमुख, दादा काळे, योगेश काळे (सर्व धनेगाव) व इतर अनोळखी पाच जणांनी लाकडी दांडके घेऊन शिवीगाळ केली. तुम्ही येथून चालते व्हा, नाहीतर तुमचे मुडदे पाडू अशी धमकी दिली. कामगार तलाठी हजारे यांना मारहाण केली. 


तहसीलदार विशाल नाईकवडे हे पोलिसाला घेऊन खासगी कारने घटनास्थळी आले असता वाळूतस्कर दादा काळे याने कुऱ्हाड त्यांच्या दिशेने फेकली. ती तहसीलदारांनी चुकवली. त्यानंतर आरोपी अमित देशमुख, योगेश काळे व इतर पाचजणांनी तलाठी हजारे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ढकलून दिले. वाळूतस्कर वाळूचा टिपर घेऊन पळून गेले. जामखेड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस. के. कारंडे, उपाध्यक्ष आय. एन. काळे, सरचिटणीस व्ही. व्ही. मोराळे, बी. एस. लटके, जी. एम. गर्कळ, जखमी तलाठी यांच्यासह संघटनेच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देत या घटनेचा निषेध केला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...