आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार सेवा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमला आग; दस्तऐवज जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- बजाजनगर, महाराणा प्रताप चौकातील पी-११८ महावीर कॉम्प्लेक्समधील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना क्र.१ येथील रेकाॅर्ड रूमला शनिवारी आग लागली. या आगीत जुने व नवीन सर्वच रेकाॅर्ड जळून खाक झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमनच्या जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले आहे. याचा तपशीलही अद्याप प्राप्त झाला नाही. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास महिला फौजदार सविता तांबे करत आहेत.

 

ईएसआयसीधारक कामगार व त्यांच्या आश्रित कुटुंबीयांसाठी बजाजनगरात सेवा दवाखाना क्रमांक १ व तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मॉडेल डिस्पेन्सरी पंढरपूर या दोन रुग्णालयातून प्राथमिक उपचार केला जातो. घटनेच्या दिवशी शनिवारी २९ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सेवा दवाखाना येथील क्रमांक एकच्या खोलीत रेकाॅर्ड रूमला आग लागली. ही घटना सर्वप्रथम गरुडझेप अकॅडमीच्या तरुणांच्या निदर्शनास आली.

 

त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक व इमारतीमध्ये वास्तव्यास असणारे व्यावसायिक सचिन बेदमुथा हे कुटुंबीयांसह इमारतीबाहेर धावले. वसंत खंडागळे, शिवानंद भोळे आदींनी अग्निशमन कार्यालय, पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. हाकेच्या अंतरावर असणारे अग्निशमन दलाचे जवान बंबासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संगणक, प्रिंटर, स्ट्रेचर, कपाट, खुर्च्या यासह ऑटोक्लेव्हर मशीन व सर्वात महत्त्वाचे जुने व नवीन सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. यामध्ये किती नुकसार झाले आहे. याचा शोध सुरू आहे.

 

वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला
ईएसआयसी कामगार रुग्णालय येथील कागदपत्र व इतर शासकीय दस्तऐवज असणाऱ्या खोलीला शनिवारी पहाटे आग लागून दस्तऐवज व इतर सामान जळून खाक झाले.

 

दरवाजाचे कुलूप तोडले, विद्युत पुरवठा केला खंडित
अग्निशमनच्या जवानांनी रुग्णालयाचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात अाणली. त्याच वेळी एमएसईबीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश दाभाडे, बापूसाहेब चव्हाण, अशोक कामटकर आदींनी संबंधित इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला.

 

कापड, इलेक्ट्रिकल जनरल स्टोअर्स आदी दुकाने बचावली
ज्या कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर कामगार रुग्णालय आहे, त्याच कॉम्प्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरवर रेकॉर्ड रूम जळाली आहे. त्याच्याखालीच कापड दुकान, इलेक्ट्रिकल दुकान, जनरल स्टोअर्स आदी दुकाने आहेत. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने व आगीची ठिणगी खालच्या माळ्यावरील दुकानात न पडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान झाले असते, असे मत व्यावसायिक वसंत खंडागळे यांनी व्यक्त केले.

 

मोठा अनर्थ घडला असता
या इमारतीमध्ये दररोज ३ डाॅक्टर,२ नर्स, २ फार्मासिस्ट, २ चतुर्थश्रेणी कामगार व एक क्लार्क असे एकूण १० कर्मचारी काम करतात. शिवाय सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपचारासाठी शेकडोंच्या संख्येत रुग्ण येतात. रुग्णालयात प्रवेश करताच डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकाच्या खोलीत आगीची घटना पहाटे घडली. त्याएेवजी ही घटना १० वाजेनंतर घडली असती तर या खोलीत बसून काम करणारा क्लर्क व उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण व इतर उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठे संकट कोसळले असते, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...