आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्याच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीवेळी रविवारी कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. धक्काबुक्कीत सहभागी असलेले गट गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील मधुसूदन केंद्रे व राजेश विटेकर यांचे असल्याचे समजते. 


शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेत होते. परभणी जिल्ह्याचा आढावा सुरू असतानाच बाहेर बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवले. बेलाॅर्ड पिएर परिसरात वाढलेला तणाव पाहून पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी पोहोचली.  घटनेवेळी कार्यालयात शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. पवार १३ जूनपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. रविवारपासून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांच्या आढाव्यास प्रारंभ झाला. त्यापैकी ४ जिल्ह्यांचा रविवारी आढावा पार पडला. पश्चिम महाराष्ट्रातील आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भाेसले व रामराजे नाईक-निंबाळकर या सातारा जिल्ह्याच्या नेत्यांत वाद उद‌्भवला होता. उदयनराजे बैठकीतून निघूनही गेले होते. विधानसभेच्या तोंडावर पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने राष्ट्रवादीची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  मुंडेंकडून सारवासारव
राजकीय चर्चा प्रक्रियेत तीव्र भावना व्यक्त होत असतात. अशा प्रकारे तीव्र भावना जाहीर चर्चासत्रातही होत असल्याचे आपण पाहतो. मात्र त्याला आपण राडा किंवा हाणामारी असे संबोधत नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोंधळानंतर स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात समाज माध्यमांवर टाकलेल्या पोस्टवरून आजचा वाद झाला. तो वाद दोन नेत्यांमधला नाही, दोन कार्यकर्त्यांमधला होता, अशी सारवासारव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

 

परभणीचा लोकसभा उमेदवार पराभूत झाल्याचे कारण

परभणी लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर उभे होते. विटेकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे विद्यमान आमदार आहेत. आश्चर्य म्हणजे घरच्या मतदारसंघात विटेकर १० हजारांनी पिछाडीवर राहिले. निवडणूक काळात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. केंद्रेंनी निवडणुकीत विटेकरांसाठी काम न केल्याचा विटेकर समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे विटेकरांचा केंद्रेंच्या आगामी विधानसभेच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यातच माजी आमदार सीताराम घनदाट गंगाखेडच्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यातूनच विटेकर-केंद्रे समर्थकांत वाद उद॰भवला.

 

अधिक जागा मागणार : २०१४ प्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत मराठवाड्यात राष्ट्रवादीला अपयशच आले. मात्र बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जागावाटपात मराठवाड्यातील अधिक जागा मागण्याची शक्यता आहे.