आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशव्यापी संप - रस्त्यावर चटणीभाकर खाल्ली, थाळीनादाने अहमदनगर झेडपी दणाणली!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर - किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्द्यांसह खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संपात सहभागी होत जिल्ह्यातील कामगारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दोन तास तिथे ठिय्या आंदोलन केले. खेड्यांतून आलेल्या महिला कामगारांनी दुपारची भूक भागवण्यासाठी बरोबर आणलेली चटणी-भाकरी रस्त्यावरच बसून खाल्ली. दुसरीकडे वारंवार आंदोलने करुनही प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत थाळीनाद करुन परिसर दणाणून सोडला. 

 

कामगारांच्या देशव्यापी संपात महापालिका कामगार संघटनेसह विडी कामगार, आयटक, इंटक, हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी, क्रांतिसिंह कामगार संघटना, सीटू, राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासह इतर संघटना सहभागी झाल्या आहेत. जिल्हा कामगार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी बारा वाजता गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी तिथे ठिय्या दिला. 

 

मोर्चेकऱ्यांनी समस्या मांडत सरकारविरोधी घोषणा दिल्या. मोर्चात हमाल पंचायतचे अध्यक्ष व नगरसेवक अविनाश घुले, बाबा आरगडे, बहिरनाथ वाकळे, मधुकर केकाण, गेाविंद सांगळे, सुभाष लांडे, शंकर न्यालपेल्ली, बन्सी सतपुते, सुधीर टोकेकर, महादेव पालवे, स्मिता औटी, पी. डी. कोळपकर आदींसह इतर कामगार नेते यावेळी उपस्थित होते. सर्वांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टा बाजारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. 

 

जिल्हा परिषदेत थाळीनाद 
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत थाली नाद आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचार्यांच्या जोरदार निदर्शनांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणानून गेली. 


या आंदोलनात एम.ए. पाटील, राजेश सिंह, मंगला सराफ, भगवान दवणे, सुषमा चव्हाण, सेतूतारका काटकाडे, सुनिता कुलकर्णी, विजया घोडके, मंगल ढगे, सविता सप्तर्षी, शोभा तरोटे, सुरेखा विखे, विमल साखरे, छाया शिंदे, शोभा लोकरे, सुनिता कुलकर्णी, विद्या घोडके आदिंसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. 

 

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्यांना दहा हजार रुपयापेक्षा जास्त मानधन मिळावे, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, २५ पेक्षा कमी मुलांची पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, सेवासमाप्तीच्या लाभाच्या रकमेमध्ये तीन पटीने वाढ करण्यात यावी, टीए डीएची रक्कम मिळावी, पाच व दहा वर्षाच्या वाढीव रकमेच्या फरकासह मानधन मिळावे, प्रत्येक महिन्याचे मानधन इतर कर्मचार्याप्रमाणे महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे आदींसह २६ विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष पसरला असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. 


प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांनी बुधवारी संप पुकारत जिल्हा परिषदेत ठिय्या देऊन थाळीनाद केला. छाया : वाजिद शेख 
कामगार महिलांनी ठिय्या आंदोलन संपल्यानंतर रस्त्यावरच बसून सोबत आणलेली भाजी-भाकरी खाल्ली. छाया : धनेश कटारिया 

 

या आहेत मागण्या... 
रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, कामगारांना १२ ते १८ हजार रूपये किमान वेतन द्यावे, शेतकरी व असंघटित कामगारांना ६ हजार रुपये पेंशन सुरु करावी, कंत्राटीकरण बंद करावे, एमआयडीसीत कामगारांसाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधावे, बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू होण्याकरिता पात्रतेवरील कमाल मर्यादा काढून टाकावी, कामगार संघटनांनी नोंदणीकरिता अर्ज केल्यापासून ४५ दिवसांत त्यांची नोंद करावी. 

 

चटणी-भाकरीची शिदोरी 
देशव्यापी संपात जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना सहभागी झाल्या. विविध ठिकाणांहून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या माेर्चात सहभागी होण्यासाठी कामगार महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. दुपारी दोन तास ठिय्या देत घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. नंतर दुपारी भूक भागवण्यासाठी बरोबर आणलेली शिदोरी सोडून रस्त्यावरच त्यांनी जेवण केले. भाजी-भाकरीची शिदोरी खाऊन पोटाची भूक भागवली. 
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे किमान वेतन व पेन्शनसह इतर मागण्यांसाठी कामगारांनी आणलेल्या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. 


विडीवरील जीएसटी कमी करा 
विडीवरील २८ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के करावा, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही विडी कामगारांना सहायता भत्ता म्हणून एक हजार रुपये द्यावेत, महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, माथाडी कामगार मंडळाला संरक्षण द्यावे, हमालांना पेंशन सुरु करावी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना किमान २० हजार वेतन द्यावे, आशा, गटप्रवर्तक, ग्रामपंचायत, अंगणवाडी एमआयडीसीतील व असंघटित कामगारांना पेंशन सुरु करावी आदी मागण्याही करण्यात आल्या

 

बातम्या आणखी आहेत...