आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामे अर्धवट; तरीही सोलापूर-हैदराबाद महामार्गावर आजपासून टोलवसुली करण्याची कंत्राटदाराकडून घाई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबादास जाधव 

उमरगा - सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप अर्धवट असताना तसेच संपादित जमिनीच्या मावेजाची प्रकरणे प्रलंबित असताना ८३ किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी पथकर (टोल वसुली) नाका सोमवारपासून (दि.३) सुरू करण्यात येत आहे. या टाेल वसुलीच्या विरोधात वाहनधारकांनी संताप व्यक्त केला असून, कामे पूर्ण झाल्याशिवाय वसुली केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिला आहे.

सुमारे सात वर्षांपासून सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. एसटीपीएल कंपनीकडे कामाचा ठेका असून, त्यांच्याकडून आष्टामोड ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंतचे काम पीबीएआय या कंपनीने केले आहे. महामार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून भूसंपादनाच्या प्रलंबित प्रकरणामुळे काम सुरू करण्यास विलंब होत गेला. रस्ता महामार्गाच्या संबंधित अधिकारी, कंपनी ठेकेदार यांना लोकप्रतिधींनी बैठकीत काम दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र कामात अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नसताना सोमवारपासून ८३ किलोमीटर अंतरावर तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी व उमरगा तालुक्यातील तलमोडजवळ टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांत पथकर नाक्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, सोमवारपासून प्रत्यक्ष कर वसुलीला सुरुवात होणार आहे.  अनेक ठिकाणी जुन्या मार्गावरच पुनर्बांधणी न करता डांबरीकरणाचे काम केल्याचा प्रकार झालेला आहे. जकेकुर येथील बलसुरमोडपर्यंतच्या जुन्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम झाले. शिवाय जुन्याच पुलाला मुलामा देऊन नव्याने केल्याचे दाखवण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र येळी-दाळींब-आष्टामोड यासह अनेक ठिकाणी रस्त्यावर दिसून येत आहे. सात वर्ष झाल्यानंतरही कंपनीला ८३ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करता आले नाही. मात्र तीन महिन्यांत टोल नाका उभारून वसुली सुरू केली जात आहे. 


जुन्या पुलाला नवा मुलामा
 :


अनेक ठिकाणी नवीन पुलाचे काम झाले असून, यापूर्वी दोन ठिकाणी पूल खचला तर बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली होती.  रस्त्याच्या कामा दरम्यान काही ठिकाणी जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून वहातुकीसाठी खुला करण्यात येत असल्याने भविष्यात दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता चौपदरीकरण, जुन्या महामार्गावर पडलेली खड्डे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली साइड पट्टी एक ते दीड फूट खोल खचल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.  दर्जाहीन कामामुळे रस्त्याला भगदाड 

महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान जुने काम उखडून काढून खड्ड्यात मुरुम, खडी भरणे आवश्यक असताना उखडलेल्या डांबरमिश्रित खडकाने रस्ता तयार करण्याचे काम केले. रस्ता बनवण्यासाठी मातीमिश्रित खडक, मुरुमाचा वापर केला गेला असून, जुना रस्ता पूर्ण उखडून खोलपर्यंत जाऊन मुरुम लागत नाही तोपर्यंत खोदकाम व्हायला हवे, पण तसे न होता जुन्या रस्त्यावरच डांबरीकरण केल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. नवीन डांबरीकरणाचे कामही दर्जाहीन झाले असून, नवीन रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. शहराच्या वळण रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध फूटभर व्यासाचे भगदाड पडल्याने रस्ता सुरू होण्यापूर्वीच निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना उघड झाला होता.असा वसूल होणार पथकर


नव्याने दोन ठिकाणी सुरू होत असलेल्या पथकर नाक्यावर संबंधित कंपनीकडून टोल वसुलीस सुरुवात होत असून, हलक्या मोटार वाहनास एकेरी ५० रुपये, परतीचा प्रवास असल्यास ७५ तर मासिक १ हजार ९५ रुपये. मालवाहू हलके वाहन/मिनिबस एकेरी ८० रुपये, परतीचा प्रवास १२५, मासिक दोन हजार ७३५ रुपये. ट्रक/बस एकेरी १७०, परतीच्या प्रवासासाठी २६० रुपये, मासिक पाच हजार ७३५. वाणिज्य वाहने एकेरी १९०, परतीसाठी २८०, मासिक ६ हजार २५५ रुपये. जड वाहने एकेरी २७० रुपये, परतीसाठी ४०५ व मासिक आठ हजार ९९५ रुपये. अवजड वाहनांसाठी एकेरी ३३०, दुहेरी ४९५ व मासिक दहा हजार ९५० रुपये पथकर आकारणी करण्यात आली आहे. जिल्हा नोंदणीकृत वाहनांसाठी हलके मोटार वाहने २५ रुपये, मालवाहू हलके वाहने/मिनीबस यासाठी ४० रुपये, ट्रक/बस यासाठी ८५ रुपये, वाणिज्य वाहने ९५ रुपये, जड वाहनांसाठी १३५ तर अवजड वाहनांसाठी ६९५ रुपये पथकर आकारणी केली जाणार आहे...तर टोल वसुली बंद पाडू
 
महामार्गावर रस्ता सुरक्षा व प्रवाशांची सोय, या दृष्टीने गाव तेथे ड्रेन व्यवस्था, सर्व्हिस रोड करणे, पथदिवे बसवणे, गतिरोधक बसवणे, आवश्यक ठिकाणी रॅम्प बसवणे, उड्डाण पुलांचे उर्वरित काम पूर्ण करणे आदींसह  बाधितांचे देयक त्वरित देणे, मावेजा प्रकरणी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे माफ करणे, स्थानिक युवकांना ८० टक्के जागेवर रोजगाराची संधी देणे याबाबत केंद्रीय रस्ते अाणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन देवून सूचना केल्या आहेत. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत टोल वसुली होवू देणार नाही. झालीच तर तीव्र आंदोलन करू 
 - ज्ञानराज चौगुले, आमदार.

बातम्या आणखी आहेत...