• Home
  • Sports
  • Other Sports
  • World Badminton Championship starting today: 357 players from 45 countries participating; There is no prize in the competition

Badminton championship / जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप आजपासून: ४५ देशांचे ३५७ खेळाडू सहभागी; स्पर्धेत बक्षीस नाही

पुरुषांत माेमोता, महिलात यामागुचीला अव्वल मानांकन, सिंधू व सायना दुसऱ्या फेरीत कोर्टवर उतरणार 
 

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 19,2019 09:17:00 AM IST

नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपला साेमवारपासून बासेल (स्विझर्लंड) येथे सुरुवात होत आहे. हे चॅम्पियनशिपचे २५ वे सत्र आहे. १९९५ नंतर पहिल्यांदा चॅम्पियनशिप स्वित्झर्लंडला होईल. यात ४५ देशांचे ३५७ खेळाडू सहभागी होतील. भारताचा १९ सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होत आहे. एकेरीत भारताचे ६ खेळाडू आणि दुहेरीमध्ये ८ जोड्या प्रतिनिधित्व करतील. नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनचा दुहेरीचा किताब जिंकणाऱ्या भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली.


महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल भारताचे आव्हान ठेवतील. दुसरीकडे पुरुष एकेरीत श्रीकांत, एच. एस. प्रणय, बी. साईप्रणीत व समीर वर्मा खेळतील. महिला एकेरीची सध्याची चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन दुखापतीमुळे स्पर्धेत खेळणार नाही. जागतिक चॅम्पियनशिप बॅडमिंटनची सर्वात मोठी स्पर्धा आहे. मात्र, यात कोणतेही बक्षीस नसते. केवळ पदक आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. ही बॅडमिंटनमधील क्रमवारीसाठी सर्वाधिक गुण देणारी स्पर्धा आहे.

चीनचे सर्वाधिक ३० खेळाडू, ६ देशांचे एक-एक खेळाडू

यंदा चॅम्पियनशिपमध्ये सर्वात मोठा संघ चीनचा आहे. त्याचे ३० खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असून गेल्या वर्षीदेखील चीनचे सर्वाधिक ३१ खेळाडू सहभागी झाले होते. त्याचे ४-४ खेळाडू एकेरीत आणि तिन्ही दुहेरीत ४-४ जोड्या खेळतील. ब्राझील, श्रीलंका, क्रोएशिया, हंगेरी, मेक्सिको, इटली या सहा देशांचे प्रत्येकी एक-एक खेळाडू स्पर्धेत उतरतील. यजमान स्वित्झर्लंडचे ६ खेळाडू सहभागी झाले. सिंधू व सायनाकडून भारतीय संघाला यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. पुरूषांत देखील पदक मिळू शकते.

सिंधू व सायना दुसऱ्या फेरीत कोर्टवर उतरणार

सायना व सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दोघी दुसऱ्या फेरीत कोर्टवर दिसतील. सिंधूला पाचवे आणि सायनाला आठवे मानांकन मिळाले आहे. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना तैवानच्या पाई यू पो आणि बुल्गारियाच्या लिंडा जेचिरी यांच्यातील विजेत्याशी होईल. दुसरीकडे, सायनाचा सामना दुसऱ्या फेरीत स्विझर्लंडच्या सबरीना जाकेट व हाॅलंडच्या सोराया डि विश्च इजबर्गन यांच्यातील विजेत्याशी होईल. पुरुष एकेरीत श्रीकांतला सातवे, समीर वर्माला दहावे आणि प्रणीतला १६ वे मानांकन मिळाले. स्पर्धेत पहिल्या दिवशी श्रीकांतचा सामना आयर्लंडच्या नहाट एनगुएनशी, समीरचा सिंगापूरच्या लोह कीन यूशी, प्रणीतचा कॅनडाच्या जेसन अँथनीशी होईल. प्रणयचा फिनलंडच्या एतू हिनोशी सामना रंगेल. पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी, एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्लोक व अरुण जॉर्ज-संयम शुक्ला आव्हान ठेवतील.

X
COMMENT