आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये; जगातील तिसरी खेळाडू, क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरच्या युफेईवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल - ऑलिम्पिक पदक  विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आता एेतिहासिक सुवर्णपदकापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिने शनिवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या युफेईला पराभूत केले. तिने २१-७, २१-१४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने आव्हान कायम ठेवताना अवघ्या ४० मिनिटांत पुढच्या फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या खेळाडूंनी दाेन वर्षांनंतर या स्पर्धेत दाेन पदके निश्चित केली आहेत. यात महिला एकेरीत सिंधू आणि पुरुष एकेरी गटात बी.साई प्रणीतचा समावेश आहे. २०१७ मध्ये सायना आणि सिंधूने असा पराक्रम गाजवला हाेता. यादरम्यान सायना कांस्य आणि सिंधू राैप्यपदकाची मानकरी ठरली हाेती. 

या स्पर्धेतील दाेन वेळच्या  उपविजेत्या सिंधूने करिअरमध्ये सलग तिसऱ्यांदा  फायनल गाठली आहे. अशा प्रकारे या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा तिसऱ्यांदा पल्ला गाठणारी सिंधू ही जगातील तिसरी महिला बॅडमिंटनपटू ठरली. भारताच्या २४ वर्षीय सिंधूची नजर आता सुवर्णपदकावर लागली आहे. यासाठी तिला फायनलमध्ये २०१७ च्या चॅम्पियन आेकुहाराच्या आव्हानाचा सामा करावा लागणार आहे. 
 

युफेईला  चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा नमवले 
भारताच्या सिंधूला युफेईविरुद्धची आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. तिने चीनच्या या खेळाडूविरुद्ध आेव्हरऑल सहावा व चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. यासह आता तिच्या विजयाचे रेकाॅर्ड ६-३ असे झाले.
 

सिंधू आठ महिन्यांपासून किताबाच्या प्रतीक्षेत 
सिंधूला यंदाच्या सत्रात  समाधानकारक अशी कामगिरी करता आली नाही. यातूनच ती गत आठ महिन्यांपासून किताबाच्या प्रतीक्षेत आहे. तिची यंदा ही दुसरी फायनल आहे.तिने इंडाेनेशिया आेपनच्या अंतिम फेरी गाठली हाेती.

बातम्या आणखी आहेत...