आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक निद्रादिन : अपुरी झोप घ्याल तर लवकरच म्हातारे व्हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - आज जागतिक निद्रा दिवस आहे. लवकर येणारे म्हातारपण व अपुरी झोप एकमेकांशी निगडित असल्याचे नव्याने झालेल्या संशोधनात समोर आल्याची माहिती डिपार्टमेंट आॅफ रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे िवभागप्रमुख व निद्रातज्ज्ञ डाॅ. सुशांत मेश्राम यांनी दिली. 


ते म्हणाले, अपुऱ्या झोपेचा परिणाम लवकर वयस्कर दिसण्यात होतो. टेलोमिअर हा वयाशी संबंधित घटक पदार्थ मानवी डीएनएच्या दोन्ही टोकाला असतो. डीएनएची साखळी टेलोमिअरच्या दोन्ही टोकांशी जोडलेली असते. अपुऱ्या व खंडित झोपेमुळे या टेलोमिअरची लांबी कमी कमी होत जाते. तसतसा माणूस लवकर म्हातारा दिसायला लागतो. 


यामुळे प्रसंगी कर्करोगही होऊ शकतो. दीर्घायु व्हायचे असेल तर सर्वसाधारण व्यक्तीसाठी किमान सात ते आठ आणि ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी ७ ते ७.३० तास गाढ झोप आवश्यक आहे. आठवडाभर एक तास कमी झोप झाली तर शरीरातील ७०० जनुके कमी होतात. त्याचा परिणाम वयस्कर दिसण्यात होतो. झोपेत श्वास घेताना अनियमितता असल्यास स्लीप अॅपनिया आजार होऊ शकतो. यामुळे दिवसा झोप येते व थकवा येतो. उच्च रक्तदाब व हृदयविकार होऊ शकताे. 


स्मरणशक्ती कमी होते : अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होणे, मधुमेह, लठ्ठपणा, प्रतिकार शक्ती कमी होणे आदी आजार होतात. तसेच मानसिक आजार उद्भवतात.  आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियामुळे ४० टक्के प्रौढ लोक प्रभावित आहेत. रेस्टलेस लेग सिंड्रोम ३ ते १० टक्के लोकांमध्ये आढळतो. आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाग्रस्त रुग्णांच्या वरच्या भागातील श्वासनलिका वारंवार ब्लाॅक होतात. यामुळे श्वास १० सेकंद ते १ मिनिटाच्या वर थांबून राहत असल्यामुळे शरीरातील आॅक्सिजन कमी होतो. असे एका तासात ५ ते ५० किंवा यापेक्षाही जास्त वेळा होते. त्यामुळे हृदयावर दाब वाढून आजार उद्भवतात. 


झोपेच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे घातक   
झोपेशी निगडित बरेचसे आजार होण्यापूर्वीच टाळता येऊ शकतात. तरीही एकतृतीयांशपेक्षाही कमी रुग्ण डाॅक्टरांचा सल्ला घेतात. जगातील सुमारे ४५ टक्के लोकांना झोपेशी निगडित आजार आहेत. झोपेचा कालावधी, सातत्य व गुणवत्ता या निरोगी झोपेचे मुख्य घटकाकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. आपण जीवनाचा एकतृतीयांश भाग झोपतो. व्यायाम व पोषण तत्त्वांप्रमाणेच लहान मुलांच्या वाढीसाठी झोप महत्त्वाची आहे. अन्यथा त्यांना लठ्ठपणाचे आजार उद्भवतात, असे संशोधनात आढळले आहे.


अशी आहे चांगल्या झोपेची नियमावली   
- रोज ठरवलेल्या एकाच वेळेवर झोपावे आणि उठावे.   
- दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त झोपू नये.   
- झोपेच्या ४ तास आधी धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.   
- झोपेच्या ६ तास आधी चहा, काॅफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नये.   
- रोज ४ तास आधी खूप मसालेदार किंवा गोड जेवण करू नये.  झोपेपूर्वी हलके जेवण चालेल.   
- रोज व्यायाम करावा, पण अगदीच झोपेच्या आधी नको.   
- बिछाना तसेच झोपेची खोली आरामदायी व हवेशीर असावी.   
- आवाज किंवा उजेडामुळे झोप माेडणार नाही याची काळजी घ्यावी.   
- झोपेची खोली फक्त झोपण्याकरिता व संबंधाकरिता वापरावी.

बातम्या आणखी आहेत...